लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : देशाला विश्वगुरू करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशावेळी जनता व सरकारी अधिकारी यांच्यात योग्य समन्वय साधला गेल्यास राज्य स्वयंपूर्ण होण्यास वेळ लागणार नाही, असे उद्गार जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी काढले.
सरकारी योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करायला हवेत. जबाबदारीने काम केले पाहिजे. सावर्डे मतदारसंघात आयोजित केलेल्या 'पंचायत चलो' अभियानामध्ये जनतेशी संवाद साधताना मंत्री सुभाष शिरोडकर बोलत होते.
किर्लपाल-दाभाळ, सावर्डे, काले व कुळे-शिगाव पंचायत क्षेत्रांना त्यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी स्थानिक आमदार गणेश गावकर, दक्षिण गोवा जि. पं. अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, धारबांदोडा जि. पं. सदस्य सुधा गावकर, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. नैसर्गिक जलस्रोतांच्या बाबतीत धारबांदोडा तालुका हा श्रीमंत असून, या नैसर्गिक जलसंपदेचे योग्य नियोजन केल्यास येथे पाण्याचे कधीच दुर्भिक्ष्य जाणवणार नाही. भविष्यात धारबांदोडा तालुक्याबरोबरच फोंडा व तिसवाडी तालुक्यांना मुबलक पाणीपुरवठा करता येईल, एवढा पाण्याचा साठा येथे आहे. जलस्रोत खात्याचा मंत्री या नात्याने याबाबतीत वेगवेगळ्या घटकांशी बोलून ठोस कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.
विकास करण्यात तडजोड नाहीच
आमदार गणेश गावकर म्हणाले की, आतापर्यंत लोकांना जे हवे तेच करण्याचा प्रयत्न केला आहे. मतदारसंघाचा विकास कसा व्हायला हवा, या बाबतीत लोकांच्या संकल्पनांना प्राधान्य देत आलो आहे. सावर्डे मतदारसंघाच्या विकासाबाबत कोणतीच तडजोड केली जाणार नाही. प्रत्येक पंचायत क्षेत्रातीलएकही काम अर्धवट राहणार नाही, याची दखल घेतली जाईल. बेजबाबदारपणे वागणाऱ्या सहा कंत्राट- दारांना काळ्या यादीत टाकण्यात आले असून, त्यांच्या बेफिकिरीमुळे अपूर्ण राहिलेली विकासकामे नवीन कंत्राटदार नियुक्त करून लवकरच मार्गी लावली जातील, याची ग्वाही त्यांनी दिली.