पणजी : गोव्यात अलिकडे पोलिसांनी देहविक्री व्यवसायाविरुद्ध आणि कॉल गर्ल गोव्याला पुरविणा-या दलालांविरुद्धही जोरदार कारवाई सुरू केल्यामुळे प्रथमच गोव्याच्या किनारपट्टी भागातील दलाल सतर्क झाले आहेत. दुस-याबाजूने बहुतांश आंबटशौकीन पर्यटकांची दलालांकडून फसवणूक केली जाऊ लागल्याने, असे पर्यटकदेखील सावध बनले आहेत. आपली फसवणूक तर होत नाही ना? हे डील करण्यापूर्वी आता पर्यटक नव्या पद्धतीने तपासून पाहू लागले आहेत. गोव्यात हमखास कॉल गर्ल मिळतात, असा चुकीचा समज मनात ठेवूनच अजूनही काही पर्यटक हे सेक्स टुरिझमच्या मोहाने गोव्यात येतात पण त्यांची अलिकडे फसवणूकच होऊ लागली आहे. अशा पर्यटकांच्या वाट्याला अपेक्षाभंगच येऊ लागली आहे.
बार्देश, तिसवाडी, पेडणो या तालुक्यांच्या किनारपट्टी भागांमध्ये अनेक मसाज पार्लर हे पोलिसांच्या रडारवर आहेत. काही मसाज पार्लरांचा वापर सेक्स टुरिझमसाठीच केला जातो व त्यामुळे पोलिसांनी अलिकडे वारंवार मसाज पार्लरांवर छापे टाकल्याचे दिसून येते. गोव्यात गेल्या सहा वर्षात एकूण 523 कॉल गर्ल्सची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. 50 पेक्षा जास्त दलालांना पोलिसांनी पकडले. 2014 साली 53, 2015 साली 84 तर 2016 साली 86 कॉल गर्ल्सची देहविक्री व्यवसायातून पोलिसांनी सुटका केली. मसाज पार्लरांवर छापे पडू लागल्यामुळे आता चांगले पर्यटक देखील मसाज पार्लरांना भेट देण्याचा धोका पत्करत नाहीत.
पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, महाराष्ट्र अशा भागांतून कॉल गर्ल्सना गोव्यात आणले जाते. पोलिसांनी सातत्याने अलिकडे किनारपट्टीत छापे टाकून दलालांची धरपकड चालवल्यामुळे आंबटशौकीन पर्यटक आणि दलालही आपले इप्सीत साध्य करण्यासाठी आधुनिक पद्धती शोधून काढू लागले आहेत. गोव्यातील काही लॉजीस व छोटी हॉटेल्स यांच्यावर पोलिसांचे लक्ष आहे. साध्या वेशातील पोलीस अशा हॉटेलांच्या परिसरात फिरत असतात. खोटे ग्राहक दलालांकडे पाठवून कॉल गर्ल पुरविण्यासाठी पोलीस सापळा रचतात ही पद्धत आता दलालांना पूर्णपणे कळलेली आहे. यामुळे दलाल आता आपल्याकडे कॉल गर्ल मागण्यासाठी आलेला पर्यटक म्हणजे पोलिसांनी पाठवलेला खोटा ग्राहक तर नव्हे ना याची तपासणी खूप काळजीपूर्वक करून पाहतात, असे एका पोलीस अधिका-याने सांगितले. पूर्वी पर्यटक दलालांकडे गेले व मागणी केली की, लगेच कॉर्ल गर्ल्सचा पुरवठा केला जात असे.
मात्र पोलिसांची सक्रियता आणि सापळे रचण्याच्या पद्धती लक्षात आल्यामुळे आता लगेच दलालांकडून मुली पुरविल्या जात नाहीत. मात्र पर्यटकांकडून पैसे घेऊन व त्यांना लगेच मुली पुरविण्याची ग्वाही देऊन मोठय़ा संख्येने दलालांकडून पर्यटकांची फसवणूकच केली जाऊ लागली आहे, असे पोलीस अधिका-याने सांगितले. एकंदरीत गोव्यात आता जर कुठलाही पर्यटक गोव्यात हमखास कॉल गर्ल मिळतात असा समज करून घेऊन येत असेल तर तो मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहे, असा अर्थ काढावा लागेल.