पणजी : देमार हॉलीवूड चित्रपटांचा ख्यातकीर्त नायक जॅकी चॅन यांना यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आमंत्रित करण्याचे प्रयत्न जारी असून भारतभेटीवर आलेल्या चीनच्या शिष्टमंडळाकडे या संदर्भात शब्द टाकण्यात आला आहे. चीनचे प्रसारमाध्यमे, रेडिओ, चित्रपट आणि टेलिव्हिजन खात्याचे मंत्री काय फुंचावो यांच्याशी चर्चा करताना माहिती आणि प्रसारण खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही जॅकी चॅन यांना इफ्फीदरम्यान गोव्यात पाठविण्याबाबत आग्रह धरला. यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कंट्री फोकस’ विभागात चिनी चित्रपट दाखविण्यात येणार असून या विभागातून एकूण १२ चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येईल. या दरम्यान चिनी तारे-तारकांची उपस्थिती महोत्सवाचे आकर्षण वाढविणारी ठरेल, असे शासनाला वाटते. दरम्यान, चीनसोबत दृक्श्राव्य सहनिर्मितीविषयीच्या करारावर या वेळी उभयपक्षी सह्या करण्यात आल्या. चीन वर्षाला ३४ परदेशी सिनेमांची आयात करतो. यात हॉलीवूडच्या चित्रपटांची मक्तेदारी असते. परदेशी निर्मात्यांशी महसूल वाटून घेण्याच्या तत्त्वावर हे चित्रपट आयात करण्यात येतात. या योजनेंतर्गत भारताशी व्यवहारास चीन अनुकूल होईल, अशी आशा भारताला आहे. चीनमधील चित्रपट उद्योगाची व्याप्ती भारतापेक्षा दुप्पट आहे. त्या देशात पुढील १५ वर्षांत ६0 हजार चित्रपटगृहे उभी राहतील असा अंदाज आहे.
जॅकी चॅन इफ्फीत?
By admin | Published: September 20, 2014 1:21 AM