पणजी - म्हादई पाणीप्रश्नी नजिकच्या भविष्यात तोडगा न निघाल्यास मंत्रिमंडळात वाद निर्माण होऊ शकतो, असे संकेत मिळतात. सध्या काही मंत्री कामे होत नसल्याने नाराज असून ते म्हादई प्रश्नाचे भांडवल करून बंडाची भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हादई पाणीप्रश्नी कुठच्याच मंत्री किंवा आमदाराने केंद्राविरुद्ध बोलायचे नाही अशा प्रकारची अलिखित सूचना दिली गेली असल्याचे सुत्रंनी सांगितले. म्हादईचे आंदोलन वाढत गेले तर सरकारच्या प्रतिमेवर त्याचा मोठा परिणाम होईल याची कल्पना काही मंत्री व आमदारांना आहे. उत्तर गोव्यात म्हादई बचाव आंदोलनाच्या चळवळीचा परिणाम जास्त होईल, असेही मानले जात आहे. कर्नाटकमधील विधानसभेच्या पोटनिवडणुका पार पडल्यानंतरही जर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हादईप्रश्नी तोडगा काढला नाही तर गोवासरकारसमोरील समस्या आणखी वाढतील असे एक मंत्री आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर लोकमतशी बोलताना म्हणाले. आमच्या सरकारविरुद्ध आम्ही बोलू शकत नाही पण म्हादई पाणीप्रश्नी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाने कर्नाटकला दिलेले पत्र मागे घेतले गेले नाही तर गोव्यातील लोकांमधील रोष वाढत जाईल असे हे मंत्री म्हणाले. म्हादई पाणीप्रश्न मुख्यमंत्री व्यवस्थित हाताळतील. आम्ही थोडा धीर धरायला हवा, असे भाजपच्या एक-दोन आमदारांना वाटते. मात्र सर्व विरोधी पक्षांना म्हादईच्या विषयावरून सरकारने आयता इश्यू दिला अशी भावना मंत्री व्यक्त करत आहेत. केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्याच मंत्रालयाला गोव्यातील बहुतेक आमदार दोष देत आहेत. म्हादईप्रश्नी तोडगा निघाला नाही व आंदोलन वाढत गेले तर मंत्री, आमदार जाहीरपणो बोलू लागतील, त्यावेळी सरकारमध्ये वाद होईल, असे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना वाटते. मंत्री मायकल लोबो यांनी तर दोन दिवसांपूर्वीच आपली भूमिका मांडली व म्हादईप्रश्नी कोणतीच तडजोड नको असा सल्ला सरकारला दिला. मंत्री विश्वजित राणो सध्या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.