मडगाव: साळ नदीचा गाळ न उपसल्यास वेस्टर्न बायपास जवळील जमीन पाण्याखाली जाण्याची भीती बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केली आहे. तसेच, जर हे काम सुरू न केल्यास बायपासचे काम बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या प्रकल्पा अंतर्गत बाणावली भागात जो पूल बांधला जात आहे. त्याची माती नदीत पडल्याने दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसात नदीचे पाणी जवळच्या शेतात घुसले होते. यासंबंधी स्थानिकांनी चिंता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आलेमाव यांनी सार्वजनिक बांधकाम खाते आणि पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर या जागेची संयुक्त पाहणी केली.
सध्या नदीत पडलेली माती जेसीबीने दूर करून पाण्याला वाट करून दिली आहे. या प्रकल्पाच्या सर्व्हिस रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यावर साल नदीच्या बांधाची दुरुस्ती हाती घेण्यात येणार असल्याचे यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते उमेश कुलकर्णी यांनी सांगितले.
साळ नदीच्या पाणवठ्याच्या जागेतून हा रस्ता जात आहे. त्यामुळे हा रस्ता मातीचा भराव घालून बांधण्याऐवजी सिमेंटच्या खांबावर पूल बांधून पूर्ण करावा अशी मागणी स्थानिकांनी केली होती. अन्यथा या भागात पूर येण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र हा पर्याय खर्चीक असल्याने सरकारने तो नाकारला होता. त्यावेळी स्थानिक आमदार आलेमाव यांनी साळ नदीतील गाळ उपसण्याचा पर्याय पुढे आणला होता.
पाटबंधारे खात्याचे अभियंते साईनाथ जामखंडी यांनी यावेळी साळ नदीचा गाळ उपसण्याची निविदा खुली केली असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.