मडगाव : मिकी पाशेको यांच्या संदर्भात आपल्याला जी माहिती होती ती सर्व आपण पोलिसांना दिली आहे, असे असतानाही कोलवा पोलीस जर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत नाहीत, तर हा गुन्हा दाखल करावा यासाठी आपण पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठवू, अशी प्रतिक्रिया या प्रकरणातील याचिकादार अॅड. आयरिश रॉड्रिगीस यांनी व्यक्त केली.पाशेको यांनी संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी आसरा घेतला आहे, असा दावा करून गुन्हेगाराला आसरा दिल्याच्या आरोपाखाली कोलवा पोलिसांनी संरक्षणमंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारी तक्रार रॉड्रिगीस यांनी कोलवा पोलिसांत दिली होती. त्यानंतर रॉड्रिगीस यांनी शनिवारी सायंकाळी कोलवा पोलिसांत हजर होऊन माहिती द्यावी, असे त्यांना कळविण्यात आले होते. मात्र, रॉड्रिगीस पोलीस स्थानकावर हजर झाले नाहीत.याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, या आशयाचा वायरलेस संदेश सकाळपर्यंत मला पोचला नव्हता, तरीही वृत्तपत्रावर आलेल्या बातमीची दखल घेऊन कोलवा पोलिसांना मी माझे निवेदन पाठवून दिले आहे, असे ते म्हणाले. दक्षिण गोवा वकील संघटनेने आयोजित केलेल्या एका परिसंवादासाठी रॉड्रिगीस शनिवारी मडगावात उपस्थित होते. रॉड्रिगीस यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात, आपल्याला माहिती असलेली सर्व माहिती आपण उघड केली आहे. त्यापेक्षा अधिक माहिती माझ्याकडे नाही. याबाबतीत पोलिसांनी तपास करणे अपेक्षित आहे. या प्रकरणात पर्रीकरांचा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आपण उघड केला आहे. कुणावर केस दाखल करावी आणि कुणावर करू नये याचा निर्णय पोलीस घेऊ शकत नाहीत. तरुण तेजपाल प्रकरणात तपास करण्यासाठी गोवा पोलिसांनी जेवढी तत्परता दाखविली होती तेवढीच तत्परता या वेळीही अपेक्षित होती. मात्र, दुर्दैवाने तसे झाले नाही, असे रॉड्रिगीस म्हणाले. जेव्हापासून पाशेको यांच्यावर गुन्हा नोंद झाला त्या दिवसापासून पोलिसांनी ज्या कुणाला मारहाण झाली त्याला न्याय देण्यापेक्षा पाशेकोंची पाठराखण करणे पसंत केले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)
गुन्हा नोंद न केल्यास न्यायालयाची दारे ठोठवू
By admin | Published: April 26, 2015 1:32 AM