- सदगुरू पाटील, निवासी संपादक
राजधानी पणजीत सध्या एकूण पंचवीसपेक्षा जास्त रस्ते • फोडलेले आहेत. शहरात रस्त्यांचे जाळे असे आहे की, एक रस्ता फोडला तर दुसऱ्या रस्त्याने जाण्यासाठी खूप कसरत करावी लागते. कारण फोडलेल्या व ब्लॉक केलेल्या रस्त्याकडील दुसरा जो रस्ता मोकळा असतो, तो वन वे असतो. म्हणजे गाडी थेट दुसऱ्या रस्त्याने वळविण्यापूर्वी खूप विचार करावा लागतो. तो दुसरा रस्ताही जर फोडलेला असेल तर आपली कारगाडी जिथे पोहोचलीय, तिथेच रस्त्याच्या बाजूला ती पार्क करून चालत जावे लागते. पार्क करतानाही जिथे नो पार्किंगचा फलक आहे, तिथेच ती पार्क करण्याशिवाय पर्याय नसतो. पार्किंगसाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. फुटपाथ फोडलेत, गटारे फोडलीत, रस्ते तर असे फोडलेत की तिथे मायनिंग सुरू झालेय असे वाटावे. सगळीकडे उडणारी धूळ पाहिली तर पूर्ण पणजी शहरात खनिज उत्खनन सुरू आहे काय असा प्रश्न पर्यटकांना पडू शकतो. श्वसनाचे आजार राजधानीत वाढतील एवढे नक्की.
पणजीचे आमदार व राज्याचे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी काल मीडियाला प्रतिप्रश्न विचारला. मी पणजीचा आमदार असलो म्हणून काय झाले, मी पणजीच्या स्थितीबाबतचा दोष माझ्यावर घेणार नाही, असे मोन्सेरात म्हणाले. येत्या पावसाळ्यात पणजीत पुन्हा पूरसदृश स्थिती होईल काय असे मीडियाने विचारले होते. त्यावर मोन्सेरात नाराज झाले. अहो, पणजी शहर मी फोडत नाही. अभियंते काम करत आहेत. मी दोष स्वीकारणार नाही, मी अभियंत्यांना जबाबदार धरीन असे सांगून बाबूश मोकळे झाले. मोन्सेरात यांनी गेले तीन महिने लोकांची टीका पाहिल्यानंतर आता शेवटी अशी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणजे येत्या पावसात जर पणजी बुडाली तर दोष आमदारावर असणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. बाबूश आताच हात झटकून मोकळे झाले आहेत.
पणजी महापालिकेचे व अन्य यंत्रणांचे अभियंते, अधिकारी आणि कंत्राटदार यांना आता अधिक सतर्क राहावे लागेल. वास्तविक मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एकदा पूर्ण पणजी शहर फिरून पाहायला हवे. रस्ते मिळेल तिथे गेल्या तीन महिन्यात फोइन ठेवले गेलेत. फुटपाथ कसे शिल्लक राहिलेले नाहीत हे सावंत यांनी अनुभवायला हवे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि राज्याच्या मुख्य सचिवांनाही सोबत घेऊन मुख्यमंत्री फिरले तर बरे होईल. त्यांना पणजीत येणाऱ्या हजारो वाहनधारकांच्या व्यथा कळतील. पणजीच्या नागरिकांचे हाल कळून येतील.
येत्या पावसाळ्यात पणजीत अनेक ठिकाणी पाणी भरणार असा अंदाज सध्या पूर्णपणे येतो. रस्त्यांचे जे भाग शिल्लक आहेत, ते खचलेत. जास्त वजन असलेला मालवाहू ट्रक अशा रस्त्यांवरून जाताना मध्येच कलंडतो. रस्त्यावर खड्डा नसला तरी, ट्रक कलंडतो. ट्रक गटारात तरी पडतो किंवा ट्रकच्या वजनाने रस्त्यावर खड्डा तयार होतो व त्यात ट्रकचे चाक रुतून बसते. अत्यंत धोकादायक स्थितीतून पणजी शहर व पणजीतील लोक जात आहेत. येत्या पावसाळ्यात काही रस्त्यांवर मोठा पूर येईल असे दिसते. मिरामार सर्कलपासून पणजीतील जुन्या नॅशनल थिएटरपर्यंत आणि पुढे मळ्यापर्यंत पणजी अशी फोडून ठेवली गेलीय की, प्रत्येक वाहन चालक कपाळावर हात मारतोय. भाजपचे काही कार्यकर्तेदेखील अस्वस्थ आहेत. मात्र सांगणार कुणाला? दहा दिवसांसाठी एखादा रस्ता फोडला व तो पूर्ण ठीक केला तर समस्या निर्माण होत नाही. मात्र तीन महिने सगळेच रस्ते खोदून ठेवले गेले आहेत. पणजी ईएसजीसमोरून जो मुख्य रस्ता जातो, तेथील रस्ता दुभाजक नवेच होते. ते ही काढून टाकले गेले आहेत. कला अकादमीसमोरून कांपाल ते मिरामारपर्यंत जे फुटपाथ आहेत, तेही फोडून तिथे नव्याने काम केले जात आहे. वास्तविक तेथील फुटपाथ जुने झाले नव्हते. सरकारी यंत्रणा करदात्यांचा पैसा वारंवार शहरे फोडण्यावर व नव्याने रचना करण्यावर खर्च करत आहे. वाहनांची प्रचंड कोंडी पणजीत होतेय, पण वाहतूक पोलिस कुठेच असत नाहीत. मुख्यमंत्री, आमदार, नगरसेवक व अन्य जबाबदार लोकप्रतिनिधींनी वाहतूक पोलिसांवर दबाव घालून त्यांना रस्त्यावर ठेवायला नको काय? वाहतूक पोलिसांनी जर वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी जास्त कष्ट घेतले असते तर वाहन चालकांचे हाल थोडे कमी झाले असते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"