लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : दक्षिण गोव्यात माझा तगडा जनसंपर्क आहे. आमदार नसलो तरीही आजही लोक माझ्या घरी येतात. कोणताही भेदभाव न ठेवता मी लोकांची कामे करत आलो आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने मला दक्षिण गोव्यात तिकीट दिले तर मी निश्चितच जिंकून येऊ शकतो, असा विश्वास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी काल व्यक्त केला.
कवळेकर यांनी काल, मंगळवारी 'लोकमत' कार्यालयास भेट दिली. यावेळी आयोजित वार्तालापावेळी ते बोलत होते. आपणही भाजपमध्ये लोकसभेच्या तिकीटासाठी इच्छूक असून पक्षाच्या योग्य त्या व्यासपीठावर मी माझे मत यापूर्वी मांडले आहे असे कवळेकर यांनी सांगितले. भाजपमध्येच माझी यापुढील सगळी राजकीय कारकिर्द असेल हेही कवळेकर यांनी एका प्रश्नास उत्तर देताना नमूद केले.
दक्षिण गोव्यातील जनतेने अनेकदा काँग्रेसला कौल दिला आहे. तुम्हाला तिकीट मिळाले तर तुम्ही ही स्थिती कशी बदलणार असे विचारले असता कवळेकर म्हणाले की, गोव्यात यावेळी लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपच जिंकणार आहे, यात शंकाच नाही. केंद्र सरकारच्या साथीने आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्याचा झालेला विकास यामुळे दक्षिणेतही भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर होईल, असे कवळेकर म्हणाले. भाजपकडे कार्यकत्यांची मोठी शक्ती आहे. संघटना आहे. मी स्वतःही लोकसंपर्काबाबत सक्षम आहे. मी कधीच कुणाला दुखवलेले नाही, असे कवळेकर म्हणाले.
केपेमधील सर्वाधिक विकासकामे माझ्या कारकिर्दीत झाली. पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा सर्वात आधी रस्ते, वीज व पाणी या मुलभूत गरजा पूर्ण करण्यावर भर दिला. ज्या गावांमध्ये जाण्यासाठी १७ ते १८ कि.मी फिरुन जावे लागायचे तिथे वन खात्याला विश्वासात घेत तो प्रवास २ ते ३ कि.मी. वर आला. एसटी समाजाला आरक्षण मिळावे म्हणून १९९८ साली झालेल्या चळवळीत मी केपेहून पुढाकार घेतला होता, असे कवळेकर म्हणाले.
वडिलांमुळेच राजकारणात आलो
लोकांच्या मदतीला धावून जाणे ही वडिलांची शिकवण, घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी मदत केली. आजही लोक येत असून वडिलांचा तो वारसा मी कायम ठेवला आहे, असे कवळेकर यांनी सांगितले. मी केपेचा आमदार होतो पण सासष्टीसह काणकोण, सांगेपर्यंतच्या कोणत्याही मतदारसंघातून लोक माझ्याकडे आले की मी मदत करत असे. आजही लोकसंपर्क वाढवत ठेवला आहे, असे कवळेकर म्हणाले.
दक्षिणेत कामाचा अनुभव
गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मी कॉंग्रेसमध्ये होतो. फ्रान्सिस सार्दिन यांच्या विजयासाठी मी संपूर्ण दक्षिण गोवा पिंजून काढला आहे. रात्री दीड वाजेपर्यंत मी दक्षिणेत त्यावेळी बैठका घेत होतो. तळागाळातील मतदारांपर्यंत मी पोहोचलो आहे. ख्रिस्ती व मुस्लिम मतदार बांधवही माझ्यासोबत आहेत. त्यामुळे हे मतदार पक्षाने मला उमेदवारी दिल्यास माझी साथ देतील, असे कवळेकर म्हणाले.
मी आयुष्यात वारंवार पक्ष बदलले नाही. काँग्रेसमधून मी भाजपमध्ये आल्यानंतर भाजपने मला मान-सन्मान दिला. आजही दिला जात आहे. पक्षाने मला उपमुख्यमंत्रीपद दिले, पक्षाच्या उपाध्यक्षपदी बसवले, एवढेच नव्हे तर कोअर कमिटीमध्येही सदस्य या नात्याने माझे स्थान असल्याचे कवळेकर म्हणाले.