अप्पा बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: फोंड्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे याचे भान आम्हाला आहे. याबाबतीत मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदराना काळ्या यादीत टाकण्याचे सुतोवाच केले आहे. एक पाऊल पुढे जाताना मी सरकारी अभियंत्यांवरसुद्धा कारवाई व्हायला हवी असे म्हटलेले आहे. असे असतानाही दक्षिण गोव्याचे खासदार मात्र काही मंत्री कंत्राटदाराकडून कमिशन घेत असल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे असे सांगत सुटले आहेत. ह्या बाबतीत जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी कोणता मंत्री व कोणते आमदार पैसे घेतत हे सार्वजनिक रित्या जाहीर करावे, असे खुले आव्हान वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिले आहे.
त्यांच्या आरोपाचा समाचार घेताना ते पुढे म्हणाले की विरीयातो हे खूप नवे खासदार आहेत. त्यांनी बालिश विधाने करू नयेत. मुळात येथे असे काही मंत्री आमदार आहेत जे स्वखर्चाने रस्ते करत आहेत. आम्हाला जनतेची चिंता आहे म्हणून आम्ही काही वेळा सरकारी सोपस्कार व्हायच्या अगोदरच पदरमोड करून काही कामे करत आहोत. याचा त्यांनी अगोदर अभ्यास करावा. आज ते जिथे जातील तिकडे अर्धवट माहितीच्या आधारे वक्तव्य करत सुटले आहेत.
गोव्यात लष्करी राजवट लागू करावी हे त्यांचे विधान खोडून काढताना वीज मंत्री म्हणाले की, स्वतः लष्करात काम केलेल्या व्यक्तीला मिलिटरी रुल म्हणजे काय याची माहिती नाही याचे आश्चर्य वाटते. मिलिटरी रूल कधी लावतात , कोणत्या परिस्थितीत लावला जातो याचाही त्यांनी अभ्यास करावा. सरकारवर टीका करताना ती वाजवी आहे की नाही याचा त्यांनी अगोदर अभ्यास करावा. आज ते जिंकडे जातील तिकडे हवेत बाण मारण्याचे काम करत आहेत.
काँग्रेसवर टीका करताना सुदिन ढवळीकर म्हणाले की एका बाजूने काँग्रेस गोव्यात पक्षांतर केलेल्या आमदारांना पक्षात परत घेणार नाही असे सांगत आहे . तर दुसऱ्या बाजूला हरियाणा मध्ये निवडणुकी करता स्वकियाना सोडून आयात केलेल्या लोकांना ते उमेदवारी देत आहेत. याचाही अभ्यास विरीयातो फर्नांडिस यांनी करावा.