नारायण गावस -
पणजी: राज्यातील कारखाने कंपन्यांनी दुषित पाणी आपल्या इटीपी प्रकल्पामध्ये ट्रीट करावे इटीपी प्रकल्प नसल्यास कारखाने कंपनी बंद करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील कारखाने कंपन्यांना दिला आहे. पर्यावरण खाते, गोवा प्रदूषण मंडळ व गोवा जैवविविधता मंडळ यांनी आयोजित केलेल्या जागितक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी त्यांच्या सोबत पर्यावरण मंत्री ॲलेक्स सिक्वेरा, आमदार ॲलेक्स रेजिनाल्ड मुख्य सचिव पुनीत गाेयल तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
राज्याचे पर्यावरणाचे संर्वधन करणे फक्त सरकारची जबाबदारी नसून सर्वांची आहे. त्यामुळे कंपनी कारखान्यांनी पर्यावरणाच्या जतनाचा पुढाकार घ्यावा. त्यांनी दुषित पाणी नदी नाल्यात सोडू नये. तसेच हॉटेल व्यवसायिकांनी रस्त्यावर कचरा फेकू नये. लोकांनी आपल्या घरातील कचरा रस्त्यावर किंवा नदीत फेकू नयेे. कचरा व्यवस्थापनासाठी सरकार कराेडो रुपये खर्च करत आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
पंचायतींना फंड वाढवून देणारमुख्यमंत्री म्हणाले, ज्या पंचायती आपल्या भागातील कचऱ्याचे नियाेजन करतात त्यांना सरकारकडून फंड वाढवून दिला जाणार आहे. तसेच त्यांना सरकार हरित प्रमाणत पत्र दिले जाणार आहे. यंदा ठाणे आणि मेणकुरे पंचायतीला दिले आहे. तसेच पुढे शाळांनाही असे हरित प्रमाणपत्र दिले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
बांबूची लागवड वाढविणारमुख्यमंत्री म्हणाले, जमिनीची झीज हाेऊ नये यासाठी सरकार या वर्षापासून बांबू लागवडीवर भर देणार आहे. यासाठी ९ प्रजातीचे बांबू सरकारकडून मोफत दिले जाणार आहे. तसेच ५ वर्षांनी ते परत विकत घेण्याची सोयही केली जाणार आहे. लोकांनी आपल्या जमिनीत बांबू लागवड करावी जेणेकरुन जमिनीची झीज हाेणे कमी होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्यावरणाचे जतन करतात अशा कंपनी तसेच पंचायतींना हरित प्रमाणपत्र देण्यात आले.
पर्यावरण मंत्री ॲलेक्स सिक्वेरा म्हणाले, पर्यावरणाच्या जतनासाठी सर्वांनी सहकार्य करावे सरकार विविध उपक्रम राबवित आहे. लाेकांनी सेंद्रीय खताचा वापर करावा, पणी वाया न घालवता याेग्य वापर करावा. वीज वाया न घालवता त्याचाही याेग्य वापर करावा. अशा काही सोप्या गोष्टी आम्ही केल्या तर पर्यावरणाचे जतन होऊ शकते.