पणजी - म्हादई प्रश्नी कर्नाटकने गोव्याचा बोलणी करण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे मात्र त्याचबरोबर अशी अट घातली आहे की, पहिल्या बैठकीतच गोवा सरकारने म्हादईचे ७.५६ टीएमसी फूट पाणी कर्नाटकला द्यायला हवे.
कर्नाटकचे जलस्रोतमंत्री एम. जी. पाटील यांनी बेळगांव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, एक-दोन दिवसात जर ही बैठक बोलावली जात असेल तर मुख्यमंत्री सिध्दरामय्या आपले पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करुन या बैठकीस उपस्थित राहण्यासही तयार आहेत. परंतु गोवा सरकार जर का बैठक लांबणीवर टाकत असेल तसेच या प्रश्नावर विलंबनीती अवलंबत असेल तर मात्र सरकार यात राजकारण करीत असल्याचे स्पष्ट होईल आणि आम्हाला ते नकोय, असेही पाटील म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आमच्या प्रस्तावित प्रकल्पानुसार म्हादईच्या ३५ टीएमसी फूट पाण्यावर आमचा दावा होता. परंतु आता बैठकीत या गोष्टींची चर्चा केली जाणार नाही. केंद्र सरकारने २00२ साली मंजूर केल्यानुसार ७.५६ टीएमसी फूट पाणीच आम्ही गोव्याकडे मागणार आहोत. केंद्र सरकारने ही मंजुरी दिली खरी, परंतु गोव्याने हरकत घेतल्यानंतर काही महिन्यातच स्थगित केली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जर का ही हरकत मागे घेत असतील आणि ७.५६ टीएमसी फूट पिण्याचे पाणी कर्नाटकला देत असतील तर त्यावर आम्ही समाधानी आहोत.
पर्रीकरांनी शिष्टाचार गुंडाळल्याचा आरोप
दरम्यान, पर्रीकर यांनी सरकारकडे संपर्क करण्याऐवजी कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडुयुराप्पा यांना पत्र लिहिले हे शिष्टाचाराला धरुन नाही, असा आरोप पाटील यांनी केला. पर्रीकर यांनी एकतर मुख्यमंत्री सिध्दरामय्या, जलस्रोतमंत्री म्हणून मला किंवा मुख्य सचिवांना पत्र लिहायला हवे होते. असे असले तरी कर्नाटकातील लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून याकडेही दुर्लक्ष करण्याची आमची तयारी आहे. गोव्याचे जलस्रोतमंत्री विनोद पालयेंकर यांनी म्हादई प्रश्नी आम्ही घाणेरडे राजकारण करीत आहोत, अशी जी अपमानास्पद टीका केली आहे तीदेखिल विसरण्यास आम्ही तयार आहोत. महाराष्ट्रालाही या बोलणीत सहभागी करुन घ्यावे, अशी मागणी त्यानी केली आहे.