लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'प्रत्येक व्यक्तीने दिवसातील आपला एक तास योगासनांसाठी समर्पित करावा. जर तुम्हाला रोग नको असेल तर योग करावा, असे आवाहन प्रख्यात योगगुरु रामदेव बाबा यांनी केले. मिरामार पणजी येथे तीन दिवसीय विशाल योग शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हजारोंची योग साधकांची उपस्थिती लाभलेल्या या शिबिरास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही रामदेव बाबा यांच्यासोबत उपस्थिती लावली.
महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर मिरामार समुद्रकिनारी सनातन धर्म संघातर्फे आयोजित तीन दिवसीय योग शिबिराची सुरुवात भव्य स्वरूपात झाली. हजारो योग साधकांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पहाटे पावणेचार वाजताच सर्व योग साधक शिबिरस्थानी उपस्थित होते.
स्वामी रामदेव बाबा, सद्गुरू ब्रह्मेशानंद महाराज, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महादेवाच्या अभिषेकाने झाली. त्यानंतर रामदेव बाबांनी यांनी योग शिबिराचे संचलन केले. महाशिवरात्रीचे औचित्य साधून योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा प्रचार करणे हा योग शिबिराचा उद्देश होता.
उपस्थित योग साधकांना मार्गदर्शन करताना रामदेव बाबा म्हणाले की, 'प्रत्येक व्यक्तीने आपले वेळापत्रक कितीही व्यस्त असले तरीही योगासनांसाठी एक तास द्यायला हवा. आपल्या जीवनात आरोग्याला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे. तरच आपण आरोग्य टिकवून ठेवू शकतो.'
उपस्थितांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निरोगी जीवनशैली आत्मसात करण्याचे महत्त्व पटवून देत गोव्यातील जनतेला अशा योग शिबिरांना उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित केले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीने, व सरकारची निरोगी जीवनशैली व शारीरिक तसेच मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देण्याची वचनबद्धता दर्शविली.
दरम्यान, गोव्यात कॅन्सरचे प्रमाण चिंता करण्याइतके वाढले आहे. गोवा कॅन्सर रजिस्ट्रीच्या माहितीनुसार १,५०० ते १,६०० कर्करोगाचे रुग्ण आहेत. या रोगाच्या बाबतीत गोव्याचा क्यूड इंडेक्स हा १०५ प्रती एक लाख लोकसंख्या असा आहे. म्हणजेच एक हजारामागे एक कर्करुग्ण असे हे प्रमाण ठरते, असी माहिती कर्करोगतज्ज्ञ डॉ. शेखर साळकर यांनी दिली.
धार्मिक पर्यटनही वाढेल
गोव्यात पर्यटक केवळ समुद्र किनारे पाहायला येणार नाहीत तर गोवा धार्मिक पर्यटनाचेही केंद्र बनणार असल्याच मुख्यमंत्र प्रमोद सावंत यांनी सांगितले. रामदेव बाबा आणि त्यांच्या पतंजली परिवारामुळे गोव्यात योग संस्कृती चांगलीच रुजत आहे. धार्मिक पर्यटनाला राज्यात मोठी संधी आहे. सरकारी पातळीवर त्यासाठी प्रयत्न केले जातील असेही ते म्हणाले.
कोविडनंतर कर्करोगात वाढ
कोविड महामारीनंतर देशात कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे योगगुरु रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. यापासून बचाव हा केवळ जीवनशैली बदलूनच होणार आहे. निरोगी राहण्यासाठी दररोज एक तास योग केलाच पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
- योग शिबिरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी पाच ते साडे सातदरम्यान अडीच तास योग शिबिर असेल. नंतर समुद्रात जलयोग प्रात्यक्षिक दाखविले जाईल. दुपारी बारा वाजता सनातन धर्म संघ सभा होणार आहे. सायंकाळी चार वाजता कार्यकर्ता बैठक आणि मार्गदर्शन कार्यक्रम होईल. रात्री आठ वाजता मुलांसाठी योगासने प्रात्यक्षिके दाखविली जातील. त्यानंतर भारतीय शिक्षा बोर्डाची बैठक व अन्य कार्यक्रम होणार आहेत. सोमवारी (दि. २०) योग शिबिराची सांगता होणार आहे. दरम्यान, शनिवारी ताळगाव येथील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवरही योग कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"