पणजी : स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा दर ९00 रुपयांवर पोहोचल्याने महिला काँग्रेसने संताप व्यक्त केला असून येत्या ७ दिवसात दर कमी न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी पत्रकार परिषदेत या विषयावर बोलताना राज्य सरकारने काही भार आपण सोसावा आणि सिलिंडरवर सबसिडी देऊन लोकांना कमी दरात ते उपलब्ध करावेत, अशी मागणी केली. त्या म्हणाल्या की, गेल्या महिनाभराच्या कालावधीतच तब्बल ५९ रुपयांनी दर वाढला. सध्या ८९६ रुपये दर असला तरी ९00 रुपये आकारले जातात.गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत झालेल्या दरवाढीचा पाढाच त्यांनी वाचला. त्या म्हणाल्या की, जानेवारीत सिलिंडरचा दर ७५२ रुपये होता. जुलैमध्ये तो ७७१ वर पोचला त्यानंतर गेल्या महिन्यात ८४0 झाला. ही दरवाढ सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेलेली आहे. गृहिणींचे बजेटच त्यामुळे हलले आहे. कुतिन्हो म्हणाल्या की, गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे भ्रष्ट पक्ष म्हणून चुकीचे चित्र भाजपाने उभे केले इतकेच नव्हे तर महागाई वाढ काँग्रेसच्या काळातच झाल्याचे जनतेला सांगून दिशाभूल केली. काँग्रेसच्या काळात सिलिंडरचा दर केवळ ४ रुपयांनी वाढला तेव्हा स्मृती इराणी आणि सुषमा स्वराज यांनी रस्त्यावर येऊन निदर्शने केली होती. या दोघीही तसेच भाजपाच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या आज सिलिंडरचा दर गगनाला भिडला असताना आहेत कुठे?, असा सवाल त्यांनी केला.मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असल्याने इस्पितळात उपचार घेत आहेत, त्यामुळे प्रशासन ठप्प झाले आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपदावरून दूर होऊन आपल्या आरोग्याकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन कुतिन्हो यांनी केले. महिला उपाध्यक्षा बीना नाईक म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना बँक खाती उघडायला लावली. परंतु त्यांच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन काही पूर्ण केले नाही. २0१३ साली कोटी नोक-यांचे आश्वासन मोदींनी दिले होते त्याचे काय झाले?, असा सवालही त्यांनी केला. पत्रकार परिषदेस इतर महिला पदाधिकारीही उपस्थित होत्या.
गॅस दरवाढ ७ दिवसांत मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरू, महिला काँग्रेसचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 8:52 PM