लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गिरीश चोडणकर हे पक्षातील गोष्टी बाहेर बोलणार नाहीत. प्रसार माध्यमांनीच पराचा कावळा केला असावा, असे विधान करीत त्यांची जर काही तक्रार असेल, तर ती पक्षाच्या व्यासपीठावर त्यांनी मांडावी, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.
चोडणकर यांना पत्रादेवी येथे प्रचाराला बोलावले नाही, त्याबद्दल विचारले असता पाटकर म्हणाले की, चोडणकर हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते माजी प्रदेशाध्यक्ष तसेच अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारी समितीवर कायम निमंत्रित आहेत. पक्षातील अंतर्गत गोष्टींबद्दल ते प्रसार माध्यमांकडे असे काही बोलणार नाहीत. त्यांच्या विधानावरून प्रसार माध्यमांनीच पराचा कावळा केला असावा.'
एल्विस गोम्स हेही आपल्याला डावलण्यात येत असल्याचे तसेच प्रदेश समितीच्या बैठकाच होत नसल्याचा जो आरोप केला, त्याबद्दल विचारले असता, पाटकर यांनी एल्विस यांनी देखील पक्षाच्या व्यासपीठावर बोलावे, असे म्हटले आहे. पाटकर म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे मडगाव येथे सभेसाठी आले तेव्हा रंगरंगोटीवरच १२५ कोटी रुपये खर्च केले. त्याबद्दल माहिती मागितली तर देत नाहीत. हे सरकार सर्वच गोष्टी लपवू पाहत आहे?, असे ते म्हणाले.
१२०० प्रकल्पांचा दावा आणि वस्तुस्थिती वेगळीच
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाच्या प्रचाराबाबत बोलताना पाटकर म्हणाले की, '२५ वर्षांच्या काळात श्रीपाद नाईक यांनी १२०० प्रकल्प आणल्याचा दावा मुख्यमंत्री करतात. परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. श्रीपाद यांनी काहीच कामे केली नाहीत, अशा तक्रारी आहेत. म्हापसा पालिकेने बजेट मांडले त्यात खासदार निधीखाली म्हापशात शून्य कामे झाल्याचे दाखवले आहे. श्रीपाद हे मयें येथे प्रचाराला गेले, तेव्हा खाणी कधी सुरू होणार हे सांगा, अशी विचारणा करून लोकांनी त्यांना भंडावून सोडले. अन्य एका ठिकाणी टॅक्सी व्याव- सायिकांनीही घेराव घातला. केंद्रात मंत्रिपद मिळूनही श्रीपाद कोणतीच कामे करू शकले नाहीत.'
मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' विधानाचे केले स्मरण
'काँग्रेसने काहीच केले नाही व पुढील ४० वर्षेही हा पक्ष निवडून येऊ शकणार नाही,' असे जे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे. त्यास उत्तर देताना पाटकर यांनी मुख्यमंत्र्यांना प्रतापसिंह राणे गौरव सोहळ्यात केलेल्या भाषणाचे स्मरण करून दिले आहे. या भाषणात मुख्यमंत्र्यांनी राणे यांचे गोव्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिल्याचा उल्लेख केला होता, याकडे पाटकर यांनी लक्ष वेधले.