लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मगो पक्ष चुकीच्या माणसांच्या हातात आहे, असा आरोप करत ढवळीकरबंधूची राजकीय कारकिर्द आम्ही संपवू, असा इशारा आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी दिल्यानंतर काही तासातच मगोपच्या केंद्रीय समितीची बैठक झाली. परब यांनी यापुढे अशी भाषा केल्यास उद्रेक होईल, असा इशाराच मगोपच्या नेत्यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना मगोपचे उपाध्यक्ष नारायण सावंत यांनी परब यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला. परब यांनी आपली पातळी पाहून बोलावे. मगोप नेतृत्त्वाबाबत तसेच पक्ष संपवण्याबद्दल काही बोलल्यास उद्रेक होईल, मगोप कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत.
पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणिचे सदस्य राघोबा गावडे म्हणाले की, आरजीने मगोप संपवण्याच्या गोष्टी विसराव्यात. आरजी हा कालचा पक्ष आहे. मनोज परब यांनी हिटलरसारखे वागू नये. लोकांकडे पैशांसाठी हात पसरुन कोणी निवडणूक लढवू नये, अशी दादागीरीची भाषा करुन मते मिळणार नाहीत.
दरम्यान, भाजपने दक्षिण गोव्यात महिला उमेदवार देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचे मगोपने स्वागत केले आहे. नारायण सावंत म्हणाले की, मगोपनेच गोव्याला पहिला महिला मुख्यमंत्री दिला. १९८० साली संयोगिता राणे खासदार झाल्या.
मगोपचे विलिनीकरण नाहीच : दीपक ढवळीकर
पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले की, मगो पक्षाचे विलिनीकरण कधीच शक्य नाही. पक्षाची घटनाच अशी आहे की, सर्वजण पक्ष सोडून गेले तरी एक कार्यकर्तादखील पक्ष पुढे नेऊ शकतो. पक्ष संपवण्याचा प्रयत्न काँग्रेस, भाजपनेही केला परंतु कोणालाही ते शक्य झाले नाही. आठवेळा आम्ही कोर्टात गेलो. घटनेप्रमाणे कोणी पक्ष विलीनही करु शकत नाही. मगोपकडे १३ टक्के मते आहेत हे आरजीने हे ध्यानात ठेवावे. अरे तुरेची भाषा करु नये. बहुजन समाजाच्या हितासाठी आम्ही पक्षाच्या माध्यमातून काम करत आहोत. भाजपने दक्षिण गोव्यात महिला उमेदवार देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचे ढवळीकर यांनी स्वागत केले आहे.
ढवळीकरांची राजकीय कारकीर्द संपवू : मनोज परब
भाऊसाहेब बांदोडकर यांचा मगो पक्ष सध्या चुकीच्या हातात आहे. ढवळीकरबंधूनी मगोपला ढवळीकर ट्रस्ट बनवले आहे. बहुजन समाजाला आधुनिक गुलामगिरीत टाकण्याचे काम त्यांनी केले असून लवकरच आम्ही ढवळीकरबंधूचा हा राजकीय व्यवसाय व त्यांची राजकीय कारकीर्द संपवू, असा थेट इशारा रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी काल दिला. भाऊसाहेबांनी बहुजन समाजाला ताकद देण्यासाठी मगोपची स्थापन केली. कालांतराने ढवळीकर बंधूनी या पक्षाला आपला राजकीय व्यवसाय बनविला आहे. पण हा त्यांचा व्यवसाय आम्ही जास्त काळ टिकू देणार नाही, ज्याप्रकारे आम्ही सत्तरीमध्ये काम केले तसेच काम आता मडकई मतदारसंघातही करणार आहोत. जोपर्यंत ढवळीकरबंधूची कारर्कीद संपवणार नाही तोपर्यंत आम्ही शांत होणार नाही, असे परब यांनी यावेळी सांगितले.