लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : शब्दानेच वेदना दिल्या जातात आणि शब्दानेच त्या भरूनही येतात, असे म्हणतात. हृदये जोडणारे शब्द चांगलेच, परंतु भावना दुखविणारे आणि सामाजिक कलह माजविणाऱ्या शब्दांचा सोशल मीडियावरही वापर केला तर तुरुंगात जाण्याची पाळी येऊ शकते.
सोशल मीडियाच्या प्रभावामुळे वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांचे भवितव्य धोक्यात येते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु वृत्तवाहिन्या आणि इतर मेनस्ट्रिम वृत्तसंस्था यांनी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मचा वापर करून आपल्या बातम्यांची व्यापकता वाढविण्यास सुरवात केल्यामुळे सोशल मीडिया आणि वृत्तसंस्था या एकमेकांच्या विरोधी ठाकण्याऐवजी एकमेकांना पूरक ठरताना दिसत आहेत.
तर जावे लागेल तुरुंगातही
आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली. जाऊ शकते. त्यामुळे समाज माध्यमांवर कोणता मजकूर टाकावा आणि कोणता टाकू नये, याविषयी प्रत्येकाने माहिती करून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा तुरुंगातही जावे लागण्याची शक्यता आहे.
आयपीसी १५३ अ आणि २९५ अ
सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यावर भारतीय दंडसंहिता कलम १५३ अ अंतर्गत गुन्हा नोंदला जाऊ शकतो किंवा २९५ (अ) अंतर्गत किंवा दोन्ही कलमा अंतर्गत नोंदला जाऊ शकतो. दोन्ही गुन्हे गुन्हा अजामीनपात्र असून गुन्हा सिद्ध झाल्यास किमान ३ वर्षापर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो.
सायबर पोलिसांचे लक्ष
अशी प्रकरणे बहुतेक करून सायबर पोलिस हाताळतात. सोशल मीडियावरील एखाद्या ग्रुपमध्ये असा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्यास पोस्ट करणारा आणि ग्रुपचा एडमीनही अडचणीत येऊ शकतो अशी माहिती एका सायबर अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
हे शब्द उच्चारुही नका
'इथे हे शब्द उच्चारू नका' असे सांगणाऱ्यांनाही ते शब्द नेमके कोणते याचा उल्लेख टाळून ते शब्द कळतील असे वर्णन करावे लागते. जे अपशब्द जातीवाचक उल्लेखातून असतात असे शब्द टाळावे. ज्या शब्दातून एकापेक्षा अधिक धार्मिक किंवा जातीच्या समूहात वितुष्ट निर्माण होऊन सलोखा बिघडण्याची शक्यता असते ते शब्द टाळावेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"