- सद्गुरू पाटीलपणजी : सुवर्ण महोत्सवी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा गुरुवारी शानदार समारोप झाला. फ्रान्स- स्वीत्झर्लंडच्या ‘पार्टिकल्स’ सिनेमाला उत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर प्राप्त झाला. रोख चाळीस लाख रुपये, चषक व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समारोपावेळी दक्षिण भारतातील चित्रपट उद्योगातील प्रख्यात संगीतकार इलायाराजा तसेच बॉलिवूडचे प्रेम चोप्रा, मंजू गोरा, रूपा गांगुली, रमेश सिप्पी, अरविंद स्वामी आदी अनेक मान्यवर उपस्थित राहिले.उत्कृष्ट सिनेमाला प्राप्त झालेले चाळीस लाख रुपयांचे बक्षीस दिग्दर्शक व निर्मात्याला विभागून देण्यात आले.दिग्दर्शक ब्लेझ हॅरिसॉन समारोप यांनी आपले मनोगत व्हिडीओद्वारे व्यक्त केले. आपण दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट असून आपल्याला इफ्फीत सर्वांत मोठा पुरस्कार मिळाल्याचे वृत्त ऐकून खूप आनंद झाला.आपण सद््गदित झालो, असे ते म्हणाले.‘जल्लीकट्टू’ या मल्याळम चित्रपटाचे दिग्दर्शक लिजो ज्योस पेल्लीसेरी यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्राप्त झाला. रौप्य मयूर व पंधरा लाख रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. उधळलेल्या रेड्याकडून झालेल्या हिंसाचारावर व माणूस विरुद्ध जनावर अशा संघर्षावर बेतलेला हा सिनेमा आहे.पेमा सेदन यांच्या ‘बलून’ चित्रपटासाठी विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आला. रौप्य मयूर व पंधरा लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.अभिषेक शाह दिग्दर्शित ‘हेल्लारो’ चित्रपटाला ज्युरींकडून विशेष दखल पुरस्कार देण्यात आला. दर्जेदार संगीत व उत्कृष्ट कोरिओग्राफीचा विचार करून हा पुरस्कार देण्यात आला. युनेस्कोचे गांधी पदक ‘व्रांदा’ या इटालियन चित्रपटाला देण्यात आले. गांधी पदक विभागाअंतर्गत संजय पी. सिंग चौहान दिग्दर्शित ‘बहात्तर हुरें’ या भारतीय सिनेमाला विशेष दखल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.इफ्फीत मराठीचा झेंडाच्‘मॅरीघेला’ या ब्राझिलियन सिनेमातील भूमिकेसाठी सेऊ जॉर्ज याला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला. उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मराठी अभिनेत्रीला प्राप्त झाला. मराठी चित्रपटांच्या दृष्टीने इफ्फीतील हे फार मोठे यश ठरले. ‘माई घाट’ नावाच्या चित्रपटात उषा जाधव हिने प्रभा माईची भूमिका साकारली आहे. तिने पुरस्कार स्वीकारला. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत तिला दाद दिली. रौप्य मयूर व दहा लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
IFFI 2019 : ‘पार्टिकल्स’ सिनेमाला सुवर्ण मयूर पुरस्कार, ५0व्या इफ्फीचा गोव्यात थाटात समारोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 4:40 AM