पणजी - भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी)गुरुवारी सायंकाळी उदघाटन होत आहे. देश-विदेशातील सिनेरसिक व इफ्फी प्रतिनिधी यांचे गुरुवारी सकाळी गोव्यात आगमन झाले आहे. गोव्याची राजधानी असलेले पणजी शहर व परिसरातील हॉटेल्समधील सगळया खोल्या पाहुण्यांनी भरल्या आहेत. मांडवी किना-यावर रातराणी फुलल्यासारखे रात्रीच्यावेळी पणजीचे दृश्य दिसते.
पूर्ण पणजीनगरी सजलेली आहे. इफ्फीसाठी नोंद झालेल्या प्रतिनिधींना आयोजकांकडून ओळखपत्रंचे वितरण केले जात आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रलयाकडून राष्ट्रीय फिल्म डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन व चित्रपट महोत्सव संचालनालयाच्या सहकार्याने इफ्फीचे आयोजन केले जात आहे. फिल्म बाजारही इफ्फीला जोडून भरणार आहे. दि. 28 नोव्हेंबर्पयत इफ्फीचा सगळा सोहळा चालेल. जगातील 82 देशांतील एकूण 195 चित्रपट इफ्फीमध्ये दाखविले जाणार आहेत.
या सिनेमांचा आस्वाद घेण्यासाठी जगभरातून इफ्फीचे प्रतिनिधी गोव्यात दाखल होऊ लागले आहेत. आयोजकांनी इफ्फीच्या बडय़ा पाहुण्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्सच्या खोल्या आरक्षित केल्या आहेत. सरकारी विश्रमगृह तसेच गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या हॉटेल्सच्या खोल्या व पणजी आणि परिसरातील अनेक खासगी हॉटेल्सच्या खोल्या पूर्णपणो इफ्फी प्रतिनिधींनी व पर्यटकांनी आरक्षित केल्या आहेत. खोल्यांचे दर किंचित वाढले आहेत. इफ्फी म्हणजे पर्यटकांनाही पर्वणीच असते.
जे इफ्फीचे प्रतिनिधी झालेले नाहीत, त्यांच्यासाठी मांडवीकिनारी कांपाल येथे विविध उपक्रम होणार आहेत. मुलांसाठी तिथेच चित्रपट दाखविले जाणार आहे. बायोस्कोप म्हणजे चित्रपटाचे गाव उभे करण्यात आले असून यंदाच्या इफ्फीचे हे वैशिष्टय़ आहे. पणजीत पोलिस बंदोबस्त कडेकोट करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ह्या आज गोव्यात असतील. उद्घाटनानिमित्त प्रमुख पाहुणो शाहरूख खान व अन्य बडे सिनेकलाकार सायंकाळी दाखल होत आहेत.
पणजीत सर्वत्र रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे पणजी हे रात्रीच्यावेळी गोव्यातील सर्वागसुंदर व सर्वोत्कृष्ट असे पर्यटन स्थळ झाले आहे. मांडवीच्या किना:यावर रातराणी फुलल्यासारखे पणजीचे विहंगम दृश्य दिसून येते. पर्यटकांची प्रचंड गर्दी पणजीत झालेली आहे. मांडवी नदीच्या पलिकडे बेती गाव आहे. त्या गावात झालेली रोषणाई ही पणजीतून पाहिल्यानंतर मांडवीच्या अलिकडे व पलिकडेही दिवाळीच असल्याचा भास पर्यटकांना होतो. पणजी बसस्थानकापासून, पणजी बाजार, कांपाल, कला अकादमी, मिरामार, करंजाळे, दोनापावल हा सगळा पट्टा जोणारा जो प्रमुख मार्ग पणजीत आहे, त्या मार्गावरून फिरताना मुंबईतील मरिन ड्राईव्हची आठवण आल्याशिवाय राहत नाही.