पणजी- भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी ) फक्त वीस दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने सध्या इफ्फीच्या आयोजनाच्या तयारीची लगीनघाई सुरू असल्याचे पणजीत दिसून येत आहे.
गोव्याने 2003 सालापासून इफ्फीचे यशस्वीपणे आयोजन करून दाखवले. गोवा हे इफ्फीचे कायमस्वरूपी केंद्र बनल्यानंतर गोवा सरकारच्या मनोरंजन संस्थेचा उत्साह वाढला. यावेळी एनएफडीसी आणि मनोरंजन संस्था मिळून इफ्फीचे आयोजन करणार आहे.
पणजीत सध्या सजावटीचे काम सुरू झाले आहे. विशेषत: इफ्फीस्थळी प्रोजेक्टर रूमची डागडुजी करणे, कला अकादमीतील कला दालनात दुरूस्ती करणे अशी कामे सुरू आहेत. इफ्फीच्या तयारीच्या कामासाठी पूर्वीसारखे प्रचंड मनुष्यबळ लागत नाही. गोवा मनोरंजन संस्था अनेक चित्रपट महोत्सवांचे आयोजन करून सरावली आहे. इफ्फीच्या तयारीनिमित्ताने मनोरंजन संस्थेच्या पणजीतील कार्यालयात सध्या धावपळ अनुभवाला येत आहे.
येत्या 20 रोजी इफ्फीचा उद्घाटन सोहळा पणजीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये होणार आहे. तिथे दहा हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था आहे. समारोप सोहळा देखील तिथेच होणार आहे. इफ्फीचे सगळे सिनेमा पणजीत आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये तसेच माकिनेज पॅलेसमध्ये आणि कला अकादमीत दाखविले जाणार आहेत.
इफ्फीसाठी देश विदेशातील हजारो कलाकार व सिने रसिकांनी प्रतिनिधी होण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यावर सध्या प्रक्रिया सुरू आहे. इफ्फीचा माहोल पणजीत तयार होऊ लागला आहे. अनेक हॉटेल्समधील खोल्या इफ्फी प्रतिनिधींसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
पणजीत प्रमुख मार्गांच्या बाजूने स्वच्छता करणे तसेच आवश्यक तिथे रंगरंगोटी करणे आणि इफ्फीस्थळी पदपथांवरील फुटलेले टाईल्स बदलणे अशी कामे सध्या सुरू आहेत. इफ्फीच्या तयारीसाठी आयोजकांच्या हाती वेळ कमी असला तरी येत्या 19 नोव्हेंबर रोजी सगळी कामे पूर्ण झालेली असतील असे मनोरंजन संस्थेला वाटते.