- संदीप आडनाईक
पणजी - गोवा येथे सुरू असलेल्या ५४ व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा मध्यावधी टप्पा शुक्रवारी पूर्ण झाला. आहे, त्यानिमित्त मिडफेस्ट चित्रपट म्हणून नुरी बिल्ज सेलन यांनी दिग्दर्शित केलेल्या “अबाउट ड्राय ग्रासेस” हा तुर्की चित्रपटाला प्रतिनिधींनी प्रतिसाद दिला. कार्यक्रमात इस्तंबूलचे नुरी बिल्ज सेलन यांनी सत्यजित रे आपले प्रेरणास्थान असल्याचे सांगून भारत नेहमीच आवडतो असे सांगितले. आयनॉक्स स्क्रीन एकमध्ये चित्रपटापूर्वी झालेल्या कार्यक्रमात नुरी आणि चित्रपटाचे कलाकार आणि इतर तंत्रज्ञ यांचा इफ्फी मार्फत विशेष सत्कार करण्यात आला. रोचक कथाविषय आणि कलाकारांचे विलक्षण सादरीकरण यांसाठी प्रसिद्ध झालेल्या या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव प्राप्त केला आहे. कान चित्रपट महोत्सव २०२३ मध्ये या चित्रपटातील अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
“अबाउट ड्राय ग्रासेस” या चित्रपटाने कान्स चित्रपट महोत्सव २०२३, टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३, कार्लोव्ही वॅरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३, बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ तसेच साओ पाऊलो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ यांसह जगभरातील इतर अनेक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांमध्ये याआधीच आपला ठसा उमटवला आहे. अनिवार्य कर्तव्य पार पाडल्यानंतर, एका छोट्याश्या गावाच्या हद्दीतून सुटका करून घेण्याच्या एका तरुण शिक्षिकेच्या आकांक्षेभोवती या चित्रपटाची कथा आहे. निराशेला तोंड देत असलेल्या मुख्य पात्राच्या दृष्टीकोनाला नुरे या सहकाऱ्याने दिलेल्या पाठींब्याने चित्रपटाला अनपेक्षित वळण मिळते.