मडगाव : विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षाशी काँग्रेसने निवडणूकपूर्व युती करावी, असा सल्ला मी पक्षश्रेष्ठींना दिला होता. मात्र, त्या वेळी माझा सल्ला दुर्लक्षित केला गेला. हा सल्ला मानला असता तर गोव्यात आज काँग्रेस सत्तेवर असती, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी व्यक्त केले.कामत यांनी मडगावातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता त्यांनी हे मत व्यक्त केले. ते म्हणाले, गोव्यातील जनतेने काँग्रेसचे १७ आमदार निवडून आणून सत्ता आमच्या हाताशी आणून दिली होती. मात्र, काँग्रेस नेत्यांनी योग्य ते निर्णय घेतले नसल्यामुळेच काँग्रेसच्या मुखात आलेला सत्तेचा घास भाजपच्या तोंडी गेला.या वेळी कामत म्हणाले, गोवा फॉरवर्डशी काँग्रेसने युती केली असती तर किमान २४ जागा जिंकल्या असत्या. दुर्दैवाने ही युती झाली नाही. निवडणुकीनंतरही ज्या वेगाने हालचाली होणे अपेक्षित होते, त्याही झाल्या नाहीत. काँग्रेस सत्ता स्थापन करू न शकल्यामुळे मडगावात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कामत यांचा काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद झाला. या वेळी ते म्हणाले, शेवटच्या क्षणी मला विजय सरदेसार्इंशी बोलण्यास सांगितले होते; पण तोपर्यंत विजय भाजप नेत्यांकडे पोचले होते. त्यामुळे आता संपर्क साधणे शक्य नाही, असे मी कॉँग्रेस नेत्यांना सांगितले.यासंदर्भात कामत यांच्याशी संपर्क साधला असता, या सर्व होऊन गेलेल्या गोष्टी आहेत. त्यावर आता मला जास्त बोलायचे नाही, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. विजय सरदेसाई यांच्याशी बोलणी करण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते का, असे त्यांना विचारले असता, असे कुठलेही अधिकार मला दिले नव्हते, असे ते म्हणाले. मात्र, दिग्विजय सिंग आणि वेणुगोपाल हे दोघेही आदल्या दिवशी विजय सरदेसाई यांना भेटले होते. दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत मी कुठलाही निर्णय घेणार नाही, असे सरदेसाई यांनी या दोन्ही नेत्यांना सांगितले होते, असे यापैकी एका नेत्याकडून मला समजले, असे कामत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कॉँग्रेस पक्षश्रेष्ठींचे युतीच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष भोवले
By admin | Published: March 19, 2017 2:06 AM