पणजी : गोव्याच्या खाण अवलंबितांनी दिल्लीत तीन दिवस आंदोलन केले, परंतु भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने किंवा मोदी सरकारने साधी दखलसुद्धा घेतली नाही. तीन दिवसात केंद्राचा एकही मंत्री अवलंबितांच्या भेटीसाठी आला नाही, त्यामुळे खाणींच्या बाबतीत केंद्राचे धोरण आता स्पष्ट झाले आहे.
गुरुवारी जंतरमंतरवर अवलंबितांच्या आंदोलनाची काल सांगता झाली. खाणींवरील कामगार, खनिजवाहू ट्रकांवरे काम करणारे चालक, क्लीनर, बार्जेसवरील कामगार, मशिनरींवरील कामगार मिळून गोव्यातील सुमारे ६00 खाण अवलंबितांनी दिल्लीला ११ आणि १२ रोजी राम लीला मैदानावर तर १३ रोजी जंतरमंतरवर धरणे धरून आंदोलन केले.गोव्याचे बहुतांश सर्व पक्षांचे आमदार, मंत्री, पक्षाध्यक्ष यांनी अवलंबितांची दिल्लीत भेट घेऊन पाठिंबा दिला. माजी पंतप्रधान देवेगौडा यांनीही प्रत्यक्ष भेटून समर्थन दिले. परंतु भाजपच्या एकही केंद्रीय नेत्याने किंवा मोदी सरकारमधील मंत्र्याने भेट दिली नाही. गोव्यातून भाजपचे मंत्री नीलेश काब्राल तेवढे भेटले. वास्तविक खाण अवलंबितांनी दिल्लीपर्यंत हे आंदोलन पोहोचविल्याने भाजपाचे केंद्रीय नेते किंवा केंद्रीय मंत्री भेट देतील किंवा मोदी सरकारचा एखादा दूत तरी येईल, अशी अवलंबितांची अपेक्षा होती. कारण याआधी आंदोलने झाली तेव्हा भाजपने असे दूत पाठवले होते. परंतु यावेळी भाजपसाठी गोव्याचे प्रभारी म्हणून काम पाहणारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हेदेखील फिरकले नाहीत. त्यामुळे अवलंबितांचा अपेक्षाभंग झाला. आंदोलकांनी पंतप्रधान कार्यालयात निवेदन सादर केले असून गोव्यातील खाणी पूर्ववत सुरू करण्यासाठी हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
काँग्रेसचा आटापिटा
दरम्यान दुसरीकडे या आंदोलनाचा राजकीय लाभ उठविण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. गुरुवारी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, ज्येष्ठ आमदार लुइझिन फालेरो, पक्षाचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी अवलंबितांची भेट घेऊन समर्थन दिले. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना जंतरमंतर आणून खाण भागातील लोकांची गोव्यात कॉंग्रेससाठी सहानुभूती मिळविण्याचेही प्रयत्न चालले होते. परंतु मध्य प्रदेश, राजस्थान मुख्यमंत्र्याच्या निवड प्रक्रियेत राहुलजी व्यस्त राहिल्याने आंदोलकांची भेट घेऊ शकले नाहीत.
‘नाताळनंतर गोवा बंद’
आंदोलकांचे नेतृत्व करणारे पुती गांवकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, केंद्र सरकारकडून कोणतीही दखल घेण्यात न आल्याने आंदोलकांनी येत्या नाताळनंतर २६ ते ३१ डिसेंबर या काळात एक दिवसाचा गोवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, ‘नाताळला लोकांना त्रास होऊ नये यासाठी २५पर्यंत आम्ही वाट पाहू. २५ नंतर महिनाअखेरपर्यंत पुढील तीन चार दिवसात कधीही गोवा बंद करु शकतो. राहुल गांधी यांची भेट आज निश्चित होऊ शकते त्यानंतर शिष्टमंडळ त्यांची भेट घेईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी प्रयत्न चालू होते, परंतु ती न मिळाल्याने शेवटी निवेदन सादर करण्यात आले.’