पणजी : आयआयटी शैक्षणिक प्रकल्पाला सांगे, काणकोण, केपेच्या पट्टय़ात विरोध झाल्यानंतर हा प्रकल्प अखेर सत्तरी तालुक्यातील गुळेली येथे उभा करावा, अशा निर्णयाप्रत गोवा सरकार आले आहे. आयआयटीसाठी दि. 31 ऑगस्टर्पयत जागा निश्चित करा, अशी सूचना केंद्र सरकारने गोव्याला केली होती. त्यानुसार गुळेली येथे 10 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा सरकारने निश्चित केली आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. आयआयटी शैक्षणिक संस्था गोव्यात आली तरी, या संस्थेसाठी गोव्यात स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी गोवा सरकारला जागा मिळाली नाही. काणकोणलाही आयआयटीसाठी विरोध झाला. एनआयटीसाठी कुंकळ्ळीत इमारत उभी होत आहे पण आयआयटीसाठी जागा मिळत नसल्याने गोवा सरकारची अडचण झाली होती. जागा निश्चित झाली नाही तर गोव्याला आयआयटीसारख्या मोठय़ा राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या संस्थेला मुकावे लागेल याची कल्पना सरकारला आली. मुख्यमंत्री सावंत यांनी गुळेली येथे जागा पाहिली व तिच जागा आयआयटीसाठी निश्चित झाली आहे. सत्तरीत यापूर्वी गोवा व्यवस्थापन संस्था साकारली आहे.मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुळेलीच्या जागेविषयी शुक्रवारी चर्चा झाली. गुळेली येथेच आयआयटी उभी करावी लागेल अशी कल्पना मुख्यमंत्र्यांनी अन्य मंत्र्यांना दिली. त्याविषयीचा प्रस्ताव तत्तत: मंजुरही झाला. महसुल खात्याच्या ताब्यातून ही जागा शिक्षण खात्याच्या ताब्यात यापुढील काळात दिली जाईल. गुळेली हा वाळपई मतदारसंघातील भाग आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आयआयटीविषयी वाळपईचे आमदार व आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्याशी चर्चा केली होती. मंत्री राणे यांनी आयआयटी संस्था गुळेलीला येत असेल तर आपला पाठींबाच असेल असे स्पष्ट केले. देशाच्या शैक्षणिक नकाशावर सत्तरीचा भाग पोहचेल असे राणे म्हणाले. दरम्यान, शिक्षण सचिव निला मोहनन यांनीही शुक्रवारी लोकमतशी बोलताना गुळेली येथे आयआयटी संस्था साकारेल असे सांगितले.
आयआयटी शेवटी सत्तरी तालुक्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 4:18 PM