मडगाव: गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील सोनशे -कुडतरी येथे जुआरी नदीच्या पात्रात बेकायेदशीररित्या रेती उपसा केली जात असल्याचे उघड झाले असून, आज गुरुवारी एका कारवाई पोलिसांनी पंधरा क्युबिक मीटर रेती जप्त केली. घटनास्थळी एक होडी , पाणी खेचणारे एक पाईपही जप्त करण्यात आले आहे. याच भागातील क्लेमंट फर्नांडीस याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
सासष्टी तालुक्याचे मामलेदार प्रतापराव गावकर हे तक्रारदार आहेत. गुरुवारी सासष्टी मामलेदार , पोलीस , कॅप्टन ऑफ पोर्टस, जलस्त्रोत खाते तसेच खाण संचलनालयाने एक संयुक्त पहाणी केली होती. यात सोनशे येथे नदीच्या पात्रात अवैध रेती उपसा केली जात असल्याचे या पथकाला आढळून आले. घटनास्थळी रेती उपसासाठी वापरले जाणारी वस्तूही सापडल्या. आज सकाळी साडेनउ वाजता वरील पथकाने ही कारवाई केली.
भारतीय दंड संहितेच्या ३२९ व २१ खाण व खनिज कायदयांतर्गंत त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश वेळीप हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, मायणा - कुडतरी पोलिसांनी रेतीवाहू प्रकरणी कारवाई करताना काल बुधवारी दोन ट्रक पकडले होते. या प्रकरणी ट्रक चालक फ्रान्सिस गोम्स व रेहमान हवेरी या चालकाला अटक केली होती. त्यांना न्यायालयात उभे केल्यानतंर जामिनावर सोडण्यात आले.