पणजी : मळा -पणजी येथे बेकायदेशीर डोंगर कापणी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बुधवारी एकच खळबळ उडाली. यावेळी नगरनियोजन खात्याच्या भरारी पथकाने तसेच पोलिसांनी तेथे धाव घेत या भागाची पाहणी केली. बेकायदेशीरपणे डोंगर कापणी करणाऱ्या संबंधीत लोकांनी तेथे बाऊंसर आणून ठेवले आहेत. ते तेथील लोकांशी दादागिरी करीत असल्याचा आरोप करुन संबंधीतांना त्वरित अटक करावी अशी मागणी या भागातील लोकांनी केली.
या भागातील नगरोविका आदिती चोपडेकर म्हणाल्या, की गणेश चतुर्थीच्या सुटीचा फायदा घेऊन काही जण मळा भागात बेकायदेशीरपणे डोंगर कापणी करीत आहेत. सदर परिसर हा केंद्र सरकारच्या अधिकारक्षेत्रात येत असून त्यांनी तसा फलक सुध्दा लावला आहे. मात्र असे असतानाही बेकायदेशीरपणे डोंगर कापणी केली जात आहे. या डोंगराच्या पायथ्याशी घरे असून जर डाेंगराची माती या घरावर पडण्याची भीती आहे. सदर डोंगर कापणी करण्यासाठी संबंधीत लोकांनी बाऊंसर आणून ठेवले आहेत. त्यामुळे याबाबत त्यांना जाब विचारायला गेल्यानंतर तेथील बाऊंसरांनी दादागिरी केली असा आरोप त्यांनी केली.