नारायण गावस
पणजी: राज्यात कायदेशीर रेती व्यावसाय सुरु करण्यास भाजप सरकारला अपयश आले आहे. गेली अनेक वर्षे बेकायदेशीर रेती व्यावसाय हा भाजप सरकारच्या आशीर्वादाने सुरु होता. त्यात आता उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. पण न्यायालयाच्या आदेशालाही हे सरकार मानत नसल्याचे दिसून येत आहे, असे आम आदमी पक्षाचे समन्वयक ॲड. अमित पालेकर म्हणाले.
ॲड. अमित पालेकर म्हणाले, भाजपच्या खासदाराने कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना फोन करुन यात हस्तक्षेप केला हे सर्वांना माहिती आहे. यावरुन दिसून येते हे सरकार उच्च न्यायालयाच्या कामातही राजकारण करुन लाेकशाही पायाखाली तुडवत आहे. या भाजप नेत्यांना फक्त आपल्या स्वार्थाचे पडले आहे. ते लोकशाही मानत नाही आता निवडणूका जवळ आल्या असल्याने त्यांना भिती वाटत आहे. म्हणून न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जात नाही.
ॲड. पालेकर पुढे म्हणाले, राज्यात जो बेकायदेशीर रेती व्यावसाय सुरु होता तो या भाजप सरकारमुळे. या सेंड माफियांना सरकारचा आशीर्वाद आहे. ज्या हाेड्या रेती काढण्यासाठी वापरल्या जात होत्या त्याही या बाहेरील लोकांच्या आहे. अशा प्रकारे हा रेती व्यावसाय गेली अनेक वर्षे सुरु आहे. न्यायालयाने आता होड्या तोडण्याचा आदेश दिल्याने त्यात या राजकारण्यांनी दबाव घालायला सुरवात केली आहे. ही भाजपची हुकुमशाही आहे.
आम्ही हे प्रकरण लावून धरणार आहे. आता भाजप नेते हे न्यायालयापेक्षाही माेठे झाले आहे. त्यांना न्यायालयाचे आदेश मानत नाही. या सरकारला लोकशाही विरोधात काम करत आहे. म्हणून हा भ्रष्टाचार वाढला आहे. प्रत्येक व्यावसायात भ्रष्टाचार केला जात आहे. तसेच बेकायदेशीर कामात प्रोत्साहन दिले जात आहे. आता येणाऱ्या लोकसभेत या भाजपला लोक धडा शिकविणार आहे, असेही ॲड. अमित पालेकर म्हणाले.