पंकज शेट्ये वास्को : वरुणापूरी, मांगोरहील येथील महामार्गाच्या बाजूला बेकायदेशीर रित्या व्यापार करण्यासाठी लावलेल्या गाड्यांवर सोमवारी (दि.१३) मुरगाव नगरपालिकेने कारवाई केली. अनेकवेळा त्याठीकाणी व्यापाऱ्यांकडून लावण्यात येणारे गाडे मुरगाव नगरपालिकेने हटवण्यास बजावून, काहीवेळा त्यांच्याविरुद्ध कारवाई करूनसुद्धा पुन्हा तेथे गाडे लावण्यात येतात. मुरगाव नगरपालिकेने सोमवारी राबवलेल्या मोहीमेत गाडे तेथून हटवण्याबरोबरच ते जप्त करून नेण्यात आले.
सोमवारी मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष लीयो रॉड्रीगीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगाव नगरपालिकेच्या अधिकारी आणि कामगारांनी मोहीम राबवून कारवाई केली. वरुणापूरी महामार्गावर काही व्यापाºयांकडून फळे, भाजी इत्यादी साहीत्य विकण्यासाठी गाडे लावण्यात येतात. यामुळे अनेकवेळा तेथून प्रवास करणाऱ्या वाहनांना अपघाताचा धोका निर्माण होतो. मागील काळात अनेकवेळा मुरगाव नगरपालिकेने तेथे बेकायदेशीररित्या गाडे लावणाऱ्यांना ते तेथून हटवण्यास बजाविलेले आहे.
तसेच काहीवेळा कारवाई करून पालिकेने गाडे तेथून हटविले होते. मागील काळात गाडे न लावण्याचे बजावून, कारवाईत गाडे हटवूनसुद्धा पुन्हा तेथे गाडे लावण्यात आले होते. मुरगाव नगरपालिकेने सोमवारी केलेल्या कारवाईत ते गाडे जप्त करून वाहनात घालून घेऊन गेले. मुरगावचे नगराध्यक्ष लीयो रॉड्रीगीस यांनी ह्या कारवाईबाबत बोलताना वरुणापूरी जंक्शन येथील त्या व्यापाऱ्यांना अनेकवेळा बेकायदेशीररित्या महामार्गाच्या बाजूला गाडे उभे करू नकात असे कळविल्याची माहीती दिली. काहीवेळा पालिकेने कारवाई करून तेथून ते गाडे हटविल्याचे सांगितले. कारवाई करून सुद्धा ते व्यापारी पुन्हा बेकायदेशीर रित्या गाडे घालत असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करून ते गाडेच जप्त केल्याचे सांगितले.
महामार्गाच्या बाजूला अशा प्रकारे गाडे लावण्यात येत असल्याने आम्हाला वाहतूक पोलीसांनी, मामलेदार - उपजिल्हाधिकारी कार्यालयाने लेखी स्वरुपात गाडे हटविण्याचे कळविल्याची माहीती लीयो रॉड्रीगीस यांनी दिली. अशा प्रकारे बेकायदेशीररित्या महामार्गाच्या बाजूला गाडे लावण्यात येत असल्याने वाहनांना अपघाताचा धोका निर्माण होतो. यापुढे आम्ही वरुणापूरी महामार्गाच्या बाजूला बेकायदेशीर रित्या गाडे लावण्यास मूळीच देणार नसून पुन्हा पुन्हा अशा प्रकारची कारवाई राबवून गाडे लावल्याचे आढळून आल्यास ते जप्त करून नेण्यात येणार असल्याची माहीती लीयो रॉड्रीगीस यांनी दिली. मुरगाव नगरपालिकेने केलेल्या कारवाईवेळी सुरक्षेच्या दृष्टीने कुठलाच अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जवान सुरक्षेसाठी उपस्थित असल्याचे दिसून आले.