वास्को: दाबोळी विमानतळावरून रशिया जाण्याच्या तयारीत असलेल्या एका ज्येष्ठ विदेशी पर्यटकाकडून बेकायदेशीररित्या नेण्यात येणारा ‘जीपीएस डिव्हाइस’ जप्त करण्यात आला. रशिया येथील ६० वर्षीय डेनिस पोटापेव विमानात बसण्यापूर्वी त्याच्या सामानाची दाबोळी विमानतळावर तपासणी केली असताना तो बेकायदेशीर रित्या ‘जीपीएस डिव्हाइस’ नेत असल्याचे उघड झाल्यानंतर तो डिव्हाइस जप्त करण्यात आला.
दाबोळी विमानतळ पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवारी (दि.९) सकाळी ११ वाजता ती घटना घडली. रशिया येथील ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिक पर्यटक डेनिस पोटापेव ‘एरोफ्लोट रशियन एअरलाईंन्स’ विमानाने रशिया जाण्यासाठी दाबोळी विमानतळावर आला. सुरक्षेच्या दृष्टीने त्याच्या सामानाची तपासणी करताना सामानात काहीतरी संशयास्पद असल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांना जाणवले. तपासणीत डेनिसने बॅगत ‘जीपीएस डिव्हाइस’ ठेवून तो बेकायदेशीर रित्या विमानाने नेण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले. हा प्रकार उघड झाल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी डेनिसला ताब्यात घेण्याबरोबरच ‘जीपीएस डिव्हाइस’ जप्त केला.
त्यानंतर दाबोळी विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकारी ज्योती धामी यांनी दाबोळी विमानतळ पोलीस स्थानकावर त्या घटनेची लेखी तक्रार दिली. दाबोळी विमानतळ पोलीसांनी तक्रारीची दखल घेऊन विदेशी पर्यटक डेनिस विरुद्ध इंडीयन वायरलेस टेलिग्राफी कायदा १९३३ च्या ६(१ए) कलमाखाली आणि इंडीयन टेलीग्राफ कायदा १८८५ च्या २० कलमाखाली गुन्हा नोंद केला. तसेच डेनिसला ह्या प्रकरणात चौकशीसाठी ४१ ए खाली नोटीस बजावल्याची माहीती पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिली. दाबोळी विमानतळ पोलीस अधिक तपास करित आहेत.