-राजू नायक
गोव्याच्या राजकारणाने, विशेषत: भाजपाने आपले सरकार स्थिर राखण्यासाठी निचांक गाठल्याची चर्चा राज्यात होऊ लागली आहे. हल्लीच भाजपाने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोन आमदार फोडले. त्यातील एकाला उपमुख्यमंत्रीपद तर दुस-याला प्रबळ मंत्रीपद देण्यात आले.
या प्रकारामुळे राजकीय निरीक्षक खवळले आहेतच, परंतु भाजपा निष्ठावंतांमध्येही चिंता आहे. मूळ भाजपा व संघाच्या मुशीत वाढलेल्या नेत्यांना बाजूला ठेवून बाहेरच्या सत्तेला चटावलेल्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जातोय असे भाजपात वातावरण आहे व लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या पाठोपाठ तत्त्वनिष्ठ राजेंद्र आर्लेकर यांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे. सध्या भाजपात माविन गुदिन्हो, पांडुरंग मडकईकर, विश्वजीत राणे, मनोहर आजगावकर व दीपक पाऊसकर आदी बाहेरून आलेले नेते महत्त्वाची पदे बळकावून बसले आहेत.
ताजी परिस्थिती निर्माण झाली जेव्हा मगोपने सरकारविरोधात कारवाया सुरू केल्या. त्या पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांनी कॉँग्रेसशी संधान बांधले व आपल्या दोघा आमदारांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. त्यांना प्रतिटोला हाणताना या दोघाही आमदारांनी वेगळा गट बनवून भाजपात जाणे पसंत केले. एक गोष्ट खरी आहे की ढवळीकर यांना मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पडत होती व मनोहर पर्रीकर आजारी असताना त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी अनेक भल्याबु-या मार्गाचा अवलंब केला. त्यानंतर तीन पोटनिवडणुका लढवून भाजपाचा मनोभंग करण्याचीही त्यांनी व्यूहरचना केली व त्यांचे भाऊ युतीचे संकेत तोडून शिरोडा पोटनिवडणूक लढवू पाहात आहेत. या तिन्ही जागा मगोपने जिंकल्या असत्या तर भाजपा अल्पमतात येऊन त्यांना एकतर ढवळीकरांना नेतेपद द्यावे लागले असते किंवा ते कॉँग्रेसबरोबर सरकार घडवू शकले असते. त्याचा प्रतिकार करताना भाजपाने मगोपलाच खिंडार पाडणे पसंत केले.
यात जरी राजकीय व्यूहरचनेचा भाग असला तरी, भाजपाने ज्या पद्धतीने २०१७ नंतर सरकार घडवले व त्यानंतर ते स्थिर राखताना फुटिरांना पक्षात वाव देण्याचा प्रयत्न चालविला, त्यामुळे त्या पक्षाबद्दल जनमानसात तिटकारा निर्माण झाला आहे. २०१७मध्ये अल्पमतात असतानाही त्यांनी सरकार घडविले. परंतु त्यावेळी नेतेपदी मनोहर पर्रीकर होते. त्यांनी राज्याच्या हिताचे राजकारण चालविले. लोकांनी आजारी असतानाही सत्तेसाठीच्या या कसरती सहन केल्या. परंतु त्यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीने भाजपा राजकारणाचा तळ गाठू लागले आहे त्यामुळे जनता हवालदिल बनली आहे. पर्रीकरांचे अस्थिकलश फिरवून सहानुभूती मिळविण्याचा या पक्षाने जोरदार प्रयत्न चालविला आहे. परंतु लोक म्हणतात, जो बुंदसे गयी व हौदसे नही आती. भ्रष्टाचाराचा मुकाबला करणो, फुटिरांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून प्रामाणिक सरकार देत विकास योजनांना प्रचंड रेटा दिला तरच लोकांचे सरकारविषयीचे मत बदलू शकते. तसेच घडले नाही तर पुढच्या दोन वर्षात येणा-या निवडणुकीत लोक या रागाचा वचपा काढू शकतात. शिवाय २३ एप्रिल रोजी होणा-या लोकसभा व तीन विधानसभा पोटनिवडणुका यामध्ये जनता सरकारला योग्य धडा शिकवू शकते.
(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)