पणजी : हणजूण आणि पेडणे पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही पार्टीत किंवा इतर ठिकाणी ध्वनी प्रदूषण केले जात असल्याचे आढळून आले तर सरळ ध्वनि प्रदूषित करणारी उपकरणेच जप्त करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे. पोलीस, गोवा राज्या प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उत्तर जिल्हा प्रशासनाला या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.
सागरदीप शिरसईकर यांनी २०२१ मध्ये खंडपीठात जनहित याचिका दाखल करून ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यात त्यांनी राज्य सरकार, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, म्हापसा उपजिल्हाधिकारी, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक, म्हापसा उपअधीक्षक, हणजूण पोलीस निरीक्षक, गोवा पर्यटन खाते, हणजूणचे सरपंच व सचिव, अबकारी आयुक्त आणि लारिव्ह बीच शॅकचे मालक एलायनो परेरा यांना प्रतिवादी केले होते.
पार्टीत, कार्यक्रमात खुल्या जागेत ध्वनिक्षेपकांवरून मोठ्याने संगीत लावण्यास बंदी करण्याचा आदेश मागे खंडपीठाने दिला होता. परंतु या आदेशाचे हणजूण आणि पेडणे भागात मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याचा दावा करून सागरदीप शिरसईकर आणि अर्नालड डिसा यांनी खंडपीठात अवमान याचिका दाखल केली आहे. किनारी भागात ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत पार्ट्या आयोजित केल्या जात असल्याचे म्हटले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ध्वनी प्रदूषण मोजण्यासाठीची यंत्रणेही या भागात नसल्याचे म्हटले आहे. या याचिकेच्या सुनावणी वेळी खंडपठाने सर्व एजन्सींना अशी उल्लंघने आढळून आल्यास तात्काळ कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. तसेच अशा भागात आकस्मिक भेटी देऊन पाहणी करण्यासही खंडपीठाने सांगितले आहे.