- संकलक : तुळशीदास गांजेकर
हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे 'देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे होय. यापैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. माता-पिता, निकटवर्तीयांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यासाठीचा संस्कार म्हणजेच 'श्राद्ध' यावर्षी २९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष आहे. यानिमित्त...
श्राद्वातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. 'श्रद्धा' या शब्दापासून 'श्राद्ध' हा शब्द निर्माण झाला आहे. ईहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले, त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने 'केले जाते, ते 'श्राद्ध' होय.
पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढच्या लोकांत जाण्यासाठी गती मिळावी, यासाठी श्राद्धविधींद्वारे त्यांना साहाय्य करणे, आपल्या कुळातील ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त वासनांमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल, म्हणजेच ते उच्च लोकात न जाता नीच लोकात अडकून पडले असतील, त्यांच्या इच्छा-आकांक्षा श्राद्धविधींद्वारे पूर्ण करून, त्यांना पुढची गती प्राप्त करून देणे यासाठी श्राद्ध महत्त्वाचे आहे.
पितृपक्ष हे हिंदू धर्मात सांगितलेले व्रत असून, भाद्रपद प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत प्रति दिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे. एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता, ते वर्षभर तृप्त रहातात. पितृपक्षातही श्राद्ध करणे शक्य • नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल, त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे.
दत्ताच्या नामजपाने पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्यांच्या त्रासांपासून रक्षण होण्यास साहाय्य होत असल्याने, पितृपक्षात प्रति दिन दत्ताचा जास्तीतजास्त नामजप करावा. श्राद्धविधी स्वतः करायचा असतो. तो स्वतःला करता येत नाही; म्हणून आपण ब्राह्मणाकडून करवतो. आता श्राद्ध करणारे ब्राह्मणही मिळेनासे झाले आहेत. यावर उपाय म्हणून श्राद्ध-संकल्पविधीच्या पोथ्या मिळतात. त्या आणून प्रत्येकाने श्राद्ध-संकल्पविधी पाठ करावा. मुलगी, पत्नी, आई आणि सून यांनाही श्राद्ध करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. असे असले, तरी सांप्रत का श्राद्ध सांगणारे काही पुरोहित स्त्रियांना श्राद्ध करायला संमती देत नाहीत. याचे कारण असे की, पूर्वी स्त्रियांचे मौजीबंधन होत असे. मात्र, आपत्काळात, म्हणजेच श्राद्ध करण्यास कोणीही उपलब्ध नसल्यास श्राद्ध न करण्यापेक्षा स्त्रियांनी श्राद्ध करावे.
श्राद्ध करण्यास योग्य असे ब्राह्मण मिळाले नाहीत, तर मिळतील ते ब्राह्मण सांगून श्राद्ध करावे. मातेच्या श्राद्धाला ब्राह्मण मिळाले नाहीत, तर सुवासिनी सांगून श्राद्ध करावे. अनेक ब्राह्मण मिळाले नाहीत, तर एक ब्राह्मण सांगून त्याला पितृस्थानी बसवावे आणि देवस्थानी शाळिग्राम इत्यादी ठेवून संकल्प करून श्राद्ध करावे अन् ते पान गायीला घालावे किंवा नदी, तळे, सरोवर, विहीर इत्यादींमध्ये सोडावे. राजकार्य, कारागृहात, रोग किंवा इतर काही कारणे, यामुळे मृताचे श्राद्ध करण्यास असमर्थ असल्यास पुत्र, शिष्य किंवा ब्राह्मण यांच्याद्वारे श्राद्ध करावे. संकल्पविधी करावा, म्हणजे पिंडदानाविना बाकी सर्व विधी करावेत. वरील काहीही करण्यास असमर्थ असलेल्या माणसाने पुढील प्रकारे श्राद्ध करावे:
उदकपूर्ण कुंभ द्यावा, थोडे अन्न द्यावे, तीळ द्यावेत, थोडी दक्षिणा द्यावी, यथाशक्ती धान्य द्यावे, गायीला गवत घालावे, विधी इत्यादी काही न करता केवळ पिंड द्यावे, स्नान करून तीळयुक्त पाण्याने पितृतर्पण करावे.