पणजी : राज्यातील सर्व शहरांमध्ये आणि अन्य भागांतही मलनिस्सारण व्यवस्था सुधारली जाईल. सुधारणा करण्याचे काम सुरू असून तीन ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पही उभे केले जात आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खास लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, की गोवा सांडपाणी निचरा विकास महामंडळाचे काम व एकूणच राज्यातील सगळी मलनिस्सारण व्यवस्था व या व्यवस्थेशीनिगडीत प्रकल्प यांच्या कामांचा आढावा मी नुकताच घेतला. कामे कुठवर पोहचली आहे हे तपासून पाहिले. भविष्यातील नियोजनही केले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, मडगाव, ताळगाव, पणजी, वास्को, कळंगुट, म्हापसा व अन्य अनेक भागांतील मलनिस्सारण व्यवस्थेशीनिगडीत कामांचा आढावा मी घेतला. सरकारने आतार्पयत या कामांवर एकूण दीड हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. यापुढेही बराच खर्च करावा लागेल. आम्ही तो करू व कामे पूर्ण करून घेऊ. कारण मलनिस्सारण व्यवस्था सुधारली तर शहरे स्वच्छ होतील. उंडीर-मडकईसह तीन ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे केले जातील.
मुख्यमंत्री म्हणाले, की सार्वजनिक आरोग्य कायद्यातही काही दुरुस्त्या सरकार करणार आहे. मलनिस्सारणविषयक कामे करताना काही ठिकाणी अडथळे येत आहेत. ते अडथळे दूर करण्यासाठी आरोग्य कायद्यात दुरुस्त्या करणो गरजेचे बनले आहे. पंधरा दिवसांचे विधानसभा अधिवेशन जुलैमध्ये होणार असून त्या अधिवेशनात दुरुस्ती विधेयक आणले जाईल. मलनिस्सारणविषयक जोडण्या सर्व लोकांनी आपल्या घरांसाठी प्राप्त करून घ्याव्यात असे सरकारला अपेक्षित आहे.
यापूर्वी आरोग्य कायद्यात दुरुस्ती करून कुळ-मुंडकारसह सर्वानाच जैव-शौचालये देण्याची योजना सरकारने मार्गी लावली आहे. या योजनेचे अर्ज दि. 30 जूनपर्यंत पालिका व पंचायतींच्या स्तरावर उपलब्ध केले आहेत. स्वच्छ भारत कल्पनेशी आम्ही हे सगळे प्रयत्न जोडलेले आहेत.