पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. मंत्री विजय सरदेसाई यांनी शनिवारी सायंकाळी मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. तत्पूर्वी भाजपाचे संघटन मंत्री सतिश धोंड हेही स्वतंत्रपणे मनोहर पर्रीकर यांना भेटले व त्यांनी काही विषयांबाबत चर्चा केली.मनोहर पर्रीकर यांना बुधवारी अस्वस्थ वाटत होते. त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी गोव्यात चर्चा आणि चिंता पसरली होती. याच पार्श्वभूमीवर सरकार अस्थिर होत असल्याचीही चर्चा पसरली होती. विरोधी काँग्रेस पक्षाचे या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष होते.प्रत्यक्ष स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा मनोहर पर्रीकर मंत्रिमंडळातील एक महत्त्वाचे मंत्री विजय सरदेसाई यांनी शनिवारी सायंकाळी मनोहर पर्रीकर यांचे दोनापावल येथील खासगी निवासस्थान गाठले. ते अर्धा तास मुख्यमंत्र्यांसोबत बोलले. सरदेसाई म्हणाले की, 'मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीविषयी बाहेर जेवढे बोलले जाते, तशी स्थिती वाईट नाही. मी स्वत: भेटल्याने मला कल्पना आली. ते ठिक आहेत. मी मनोहर पर्रीकरांशी राजकीय विषयाबाबत चर्चा केली नाही. मडगावमधील विकास कामांविषयीही मनोहर पर्रीकर यांच्याशी बोलणी केली व माघारी परतलो. त्यांच्या प्रकृतीविषयी चिंतेचे मला कारण दिसत नाही.'दरम्यान, सतिश धोंड हेही मनोहर पर्रीकर यांना भेटून आले. धोंड व मनोहर पर्रीकर यांच्यातील चर्चा मात्र कळू शकली नाही. सरदेसाई यांनी आपल्या काही शंकांचे मनोहर पर्रीकर यांच्याकडून निरसन करून घेतल्याची माहिती मिळते.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 8:00 PM