लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : भाजप युवकांना राजकारणात येण्याचे आवाहन करत आहे. त्यानुसार २०२९ मध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने नवा युवा उमेदवार हावा, अशी विनंती आपण करणार असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. थोडक्यात त्यांनी यंदा २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक आपली शेवटची असल्याचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
म्हापसा येथील भाजपच्या उत्तर गोवा पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार सदानंद तानावडे, उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार केदार नाईक, आमदार मायकल लोबो, माजी आमदार ग्लेन टिकलो, दयानंद सोपटे, दत्ता खोलकर, नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर, उत्तर गोवा अध्यक्ष महानंद असनोडकर तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
तीन दिवसांपूर्वी पक्षाने श्रीपाद नाईक यांना उत्तर गोव्यातून उमेदवारी जाहीर केली होती. उमेदवारी देऊन पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल तसेच सोपवलेल्या जबाबदारी बद्दल श्रीपाद नाईक यांनी यावेळी पक्षाचे आभार मानले. तसेच पाच वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, असेही नाईक त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना माहिती दिली.
दरम्यान, भाजपच्या बार्देश तालुक्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा अभियानास म्हापशातून सुरुवात झाली. पाच दिवसांपूर्वी सुरू झालेले हे अभियान १५ मार्चपर्यंत तालुक्यातील सर्व मतदारसंघातून जाणार असल्याची माहिती तानावडे यांनी पत्रकारांना दिली.