लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बामणवाडो-मेरशी येथील एका भंगार अड्यावर काल, गुरुवारी झालेल्या क्लोरीन गॅस गळतीमुळे या परिसरात मोठी धावपळ उडाली. क्लोरीनमुळे जवळपास तीसहून अधिक जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले असून यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. तीन सिलिंडरमधून ही गळती झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पणजी पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत बचावकार्य केले.
सविस्तर वृत्त असे की, काल, गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास बामणवाडो येथे बेकायदेशीर भंगार अड्ड्यावर असणाऱ्या तीन क्लोरीन गॅस सिलिंडरला गळती लागली. यामुळे परिसरातील लोकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. अनेकांना चक्कर येऊ लागली तर काही जणांच्या घशात त्रास सुरू झाला. स्थनिकांनी तातडीने रुग्णवाहिका व अग्निशमन दलाशी संपर्क केला. क्लोरीनमुळे त्रास सुरू झालेल्या तब्बल ३० जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या घटनेमुळे राज्यातील भंगार अड्ड्यांमुळे होणारे नुकसान पुन्हा एकदा समोर आले आहे. या भंगार अड्ड्यामध्ये क्लोरीन सिलिंडर ठेवण्याची परवानगी नसताना या ठिकाणी एक नव्हे तर तब्बल तीन क्लोरीन सिलिंडर आणलेच कसे, याचीही चौकशी होण्याची गरज आहे.
असा हाताळला क्लोरीन सिलिंडर
क्लोरीन गळती मुख्य व्हॉल्वमधून होत नव्हती तर सिलिंडरला पडलेल्या एका छोट्याशा छिद्रातून होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे तो सिलिंडर प्लास्टीकच्या मदतीने कवर करून एका वाहनात टाकण्यात आला. पुढे पोलिसांची गाडी मधे सिलिंडरची गाडी आणि मागे अग्निशमन दलाची गाडी अशा पद्धतीने सिलिंडर सिजेंटा प्लांटवर नेण्यात आला.
जवानाची जीवाची बाजी
या घटनेचे गांभीर्य ओळखून अशा घटनांना सामोरे जाण्यात तरबेज असलेल्या फायर फायटर अमित रिवणकर यांना याची माहिती दिली. रिवणकर सुटीवर होता. मात्र घटनेची माहिती मिळताच तो धावून आला. खोर्लीतील सिजेंटा कंपनीशी संपर्क करून तिथे क्लोरीन गळती होणारा सिलिंडर घेऊन येत असल्याची माहिती दिली व सर्व व्यवस्था करून ठेवण्यास सांगितले. मोठी जोखीम पत्करून पोलिसांच्या मदतीने फायर फायटर्सने सिलिंडर सिंजेटा कंपनीच्या प्लांटवर नेला आणि त्याचा बंदोबस्त केला.
एक नव्हे तीन सिलिंडर
या घटनेमुळे राज्यातील बेकायदेशीर भंगार अड्यांचे कारनामे पुन्हा उघडे पडले आहेत. गळती एका सिलिंडरची झाली असली तरी या स्क्रैपयार्डमध्ये तीन क्लोरीनचे सिलिंडर असल्याचे आढळून आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांपासून ते लपवून ठेवण्याचाही प्रयत्न केला गेला. परंतु तो प्रयत्न एका छायाचित्रामुळे फसला आणि तिन्हीही सिलिंडर जप्त करण्यात आले.
दीड किलोमीटरवर परिणाम
क्लोरीन गळतीमुळे या भंगार अड्याशेजारी असणाऱ्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला. मात्र, या गळतीचे परिणाम तब्बल दीड किलोमीटर अंतरापर्यंत जाणवले. एकाचवेळी अनेक लोकांना या गॅस गळतीमुळे त्रास होऊ लागल्याने लोक रुग्णवाहिकेची वाट बघत होते. अनेकजण मिळेल त्या वाहनाने गोमेकॉत पोहचले. या भंगार अड्याचा मालक नामदेव पचांगे है अस्वथ स्थितीत गोमेकॉत उपचार घेत आहे.
या भंगार अड्याबद्दल काही तक्रारी होत्या याबाबत मला माहिती नव्हती. स्थानिकही आताच या सर्व गोष्टी घेऊन माझ्याकडे आले आहेत. सद्यस्थितीत हा अट्टा घातक असून तो कायमस्वरुपी बंद करणेच योग्य ठरेल. लोकांचे हित जपणे माझे काम असून याबाबत योग्य कारवाई होईल. - रुदोल्फ फर्नाडिस, आमदार