पणजी : गोव्यात वन संरक्षित क्षेत्रातील धबधबे तसेच नद्यांच्या ठिकाणी प्रवेशास वन खात्याने मनाई आदेश जारी केला आहे.पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक धबधब्यांवर गर्दी करतात. खासकरुन दुधसागर वगैरे धबधब्यांवर रविवारी सुट्टीच्या दिवशी गर्दी असते. पावसाळ्यात धबधब्यांवर पाणी वाढते आणि बुडून मरण पावण्याच्या दुर्घटना घडतात.
अशीच दुर्दैवी घटना गेल्या वर्षी घडली होती. जुलैमध्ये मैनापी, नेत्रावळी धबधब्यावर बुडून दोघांचा अंत झाल्यानंतर धबधब्यांवर पर्यटकांना बंदी घातली होती. त्यानंतर कमी धोक्याचे काही धबधबे खुले केले गेले. दुधसागर धबधबा बय्राच दिवसांनंतर खुला केला होता. पर्यटकांच्या पसंतीचे स्थान असलेल्या गोव्यातील दुधसागर धबधब्यावर पावसाळ्यात नेहमीच गर्दी असते.
पावसाळ्यात दुधसागर धबधब्यावर विहंगम दृष्य असते. गोव्याहून लोंढ्याकडे जाणारी रेलगाडी या धबधब्याजवळून जाते. लाखो पर्यटक पावसात या धबधब्याला भेट देत असतात. राज्यात हरवळे तसेच अन्य ठिकाणीही धबधबे आहेत. परंतु दुधसागरला पर्यटकांची विशेष पसंती असते.