लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील दोन फार्मा कंपन्यांनी आपल्या राज्यातील उद्योगांसाठी गोव्याबाहेर सुरू असलेल्या नोकर भरती थांबविल्यानंतर आता तिसरी कंपनी, सिप्ला फार्माने आज, दि. २६ मे रोजी गुजरातमध्ये आयोजित केलेली नोकर भरती मुलाखती रद्द केल्या. कंपनीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून कळवले आहे.
फार्मा कंपन्या राज्यातील उद्योगांसाठी राज्याबाहेर, महाराष्ट्र, गुजरातसह विविध ठिकाणी नोकर भरती करीत असल्याचे प्रकार आढळून आल्याने राज्यातील वातावरण बरेच तापले आहे. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, रिव्होल्यूशनरी गोवन्स, टीएमसी आणि आम आदमी पार्टीने याविषयी दखल घेऊन सरकारवर तीव्र टीका केली. त्यानंतर इंडोको आणि इन्क्युब या दोन फार्मा कंपन्यांनी आपल्या नोकर भरतीच्या मुलाखती थांबविल्या. इंडोको कंपनीकडून मुंबईत, तर इन्क्युबकडून पुणे येथे मुलाखतींचे आयोजन केले होते.
त्यानंतर आता सिप्ला या फार्मा कंपनीने वापी (गुजरात) येथे दि. २६ रोजी होणारी भरती मुलाखत रद्द केली आहे. मुलाखती रद्द करण्यात आल्याची माहिती देणारे पत्र कंपनीने मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. अत्यावश्यक कारणांनी मुलाखती रद्द केल्याचे म्हटले आहे; परंतु राज्याबाहेर कर्मचारी भरतीस झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर या मुलाखती रद्द केल्याची वस्तुस्थिती आहे.
स्थानिकांना प्राधान्य
दरम्यान, कंपनीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात असेही म्हटले आहे की, कंपनीकडून आतापर्यंत राज्यातील उद्योगांत स्थानिकांनाच रोजगारास प्राधान्य दिले आहे. ३१ मे रोजी कंपनीच्या राज्यात नोकर भरतीच्या मुलाखती होणार असल्याची माहिती कंपनीने गोवा रोजगार विनिमय केंद्राला दिल्याचेही पत्रात म्हटले आहे.