पणजी : वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी ढवळीकर यांचे म्हणणे उचलून धरत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील पराभवाला धर्मगुरूंना दोष देणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
मॉविन म्हणाले की, 'एकमेकांच्या धर्मगुरूंना दोष देण्यापेक्षा आपण कुठे कमी पडलो याबाबत आत्मचिंतन व्हावे.' निकालाच्या दिवशी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ख्रिस्ती धर्मगुरुंबद्दल केलेल्या विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले की, तानावडे यांनी तात्काळ दिलेली ती प्रतिक्रिया होती. निवडणुका येतात व जातात. आता सर्व काही पार पडलेले आहे. त्यामुळे लोकांची कामे करण्याला प्राधान्य देऊया.'
दरम्यान, राज्यातील वाढत्या अपघातांबद्दल विचारले असता ते म्हणाले की, अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट काढून टाकलेले आहेत. लोक बेदरकारपणे वेगाने वाहने हाकतात तसेच मद्यपान करून वाहने चालवली जातात. अलीकडच्या काही दिवसात मद्यपी चालकांविरुद्ध आघाडी उघडण्यात आलेली आहे तसेच अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना आखलेल्या आहेत.'