पणजी- कला अकादमीचे कमी दर्जाचे कामकाज पणजीत रविवारी पडलेल्या पावसात उघड झाल्यानंतर, सोमवारी दिवसभर कला अकादमी या विषयावरून गाजली. याच पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे अकादमीची पाहणी करण्यात आली. यावेळी कला अकादमीचे अधिकारी देखील उपस्थित होते.
रविवारी पडलेल्या पावसात कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये गळती लागली होती, तसेच गेल्यावर्षी अकादमीच्या खुल्या नाट्य देखील कोसळले होते, याचे डेब्रिस काढण्याचे काम देखील सुरू होते, पण रविवारी पडलेल्या पावसामुळे या कामातही व्यत्यय आला आहे. यातून कला अकादमीच्या इतर वास्तुवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेत पाहणी करण्यात आली.
अवकाळी पावसामुळे मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहासोबत, कला अकादमीच्या प्रवेशद्वार, आर्ट गॅलरी, व इतर ठिकाणी देखील पाणी साचल्याने दिसून आले. त्यामुळे एकंदरीत कला अकादमीच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या पाऊस पडल्यानंतर खुल्या नाट्यगृहाच्या डेब्रिस हटविण्याचे काम सुरू झाले आहे. मुख्य पावसाळ्या हंगामपूर्वी संपूर्ण डेब्रिस हटविण्यात येईल, असे कामगार सांगतात.