अप्पा बुवा ,फोंडा : फोंड्यातील क्रांती मैदानाला एक उज्वल व क्रांतिकारी इतिहास आहे. हा इतिहास जतन करून ठेवला पाहिजे. आज क्रांती मैदानाची जागा अजूनही लष्कराच्या ताब्यात आहे. सदर जागा फोंडा नगरपालिकेच्या ताब्यात दिल्यास येथे नागरिकांसाठी साधन सुविधा निर्माण करता येतील जेणेकरून येथे मोठ्या संख्येने लोक येत राहतील व स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास त्यांना रोज वाचता येईल. मागची अनेक वर्षे यासाठी आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहे. निदान आता तरी सरकारने आमचे ऐकावे.असे उद्गार कृषी मंत्री रवी नाईक यांनी काढले. येथील क्रांती मैदानावर आयोजित केलेल्या क्रांती दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. सुरुवातीला त्यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व माजी आमदार रोहिदास नाईक, नगराध्यक्ष रितेश नाईक, उपजिल्हाधिकारी, वेगवेगळ्या खताचे वरिष्ठ अधिकारी, नगरसेवक, पंच सदस्य यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, "आम्ही गुलामगिरीच्या जोखंडातून मुक्त झालो म्हणूनच विकासाची धारे आमच्या करता खुली झाली. अन्यथा अजूनही आम्ही मागास म्हणूनच राहिलो असतो. आज येथे शिक्षणाचे अनेक पर्याय निर्माण झाले आहेत जे त्या काळी नव्हते. ह्याचे श्रेय त्या शहिदांना जाते. बलिदानातून निर्माण झालेल्या शिक्षणाचा खरा फायदा ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला झाला. त्या थोर आत्म्यांना आदरांजली म्हणून तरी क्रांती दिवस सारख्या कार्यक्रमाला लोकांनी मुद्दाम उपस्थिती लावायला हवी. जेणेकरून स्वतंत्र सैनिकांचा योग्य तो सन्मान होईल. ज्यांनी ह्या देशासाठी त्याग केला त्यांचे नित्य स्मरण करत रहा".
यावेळी फोंडा पोलिसांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण झाल्यानंतर फोंडा तालुक्यातील विविध शाळातील मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वेळगेकर यांनी केले.