पणजी : फेडरेशन ऑफ इंटनरनॅशनल व्हॉलीबॉलतर्फे (एफआयव्हीबी) राज्यात दि. १९ ते २२ ऑक्टोबर २०२३ दरम्यान व्हॉलीबॉल वर्ल्ड बीच प्रो टूर या आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात प्रथमच अशाप्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन होणार आहे. गोमंतकीयासाठी ही अभिमानस्पद गोष्ट असणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे अध्यक्ष तथा आमदार जीत आरोलकर यांनी दिली.
दाेनापावला येथे आयोजित पत्रकार परीषदेत आमदार जीत आरोलकर यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत क्रीडामंत्री गोविंद गावडे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते. भारतात पहिल्यांज ही स्पर्धा होत आहे, आणि ती देखील गोव्यात होणार असल्याने ही स्पर्धा आमच्यासाठी खास असणार आहे. जगभरातील ५० देश या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील साधनसुविधा पुरविण्यावर आमचा संपूर्ण भर असणार आहे. या स्पर्धेमुळे निश्चितच क्रीडा क्षेत्रासोबत पर्यटन क्षेत्र देखील बहरणार आहे. आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल एफआयव्हीबीचे खुप आभार, मुख्यमंत्री, क्रीडामंत्री यांचे देखील आम्हाला पाठींबा आहे, त्यामुळे सर्वात यादगार अशी ही स्पर्धा करु, असे आरोलकर यांनी यावेळी सांगितले.
गोवा हे सी, सॅण्ड आणि सन यासाठी ओळखले जाते, त्या अनुषंगाने बीच व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी गोवा हे सर्वात अनुकुल ठिकाण आहे. यापूर्वी येथे लुसोफोनीया स्पर्धेदरम्यान बीच व्हॉलीबॉल स्पर्धा खेळविण्यात आली होती. देशभरातील अव्वल व्हॉलीबॉलपटू या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यात येणार आहे. तसेच ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय मीडीया कव्हर करणार आहे, त्यानिमित्ताने गोवा जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहचणार आहे. यातून क्रीडा क्षेत्र वेगळ्या स्तरावर पोहचणार आहे, असे यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.