लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : गणेश चतुर्थीप्रमाणे दिवाळी सणालाही गोमंतकीयांकडून तेवढेच महत्त्व दिले जाते. दिवाळीतील लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज हे सर्व सण महत्त्वाचे असून या दिवसांत घरात गोडधोड व विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. या सणासुदीच्या दिवसांसाठी आवश्यक असलेले कडधान्य, अन्य वस्तूंच्या दरात बरीच साखर वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींना आपला हात राखूनच खर्च करण्याची वेळ आली आहे.
तूरडाळीचे दर आकाशाला भिडले
सध्या किराणा दुकानांमध्ये व बाजारपेठात दोन प्रकारची तूरडाळ उपलब्ध आहे. हलक्या दर्जाची तूरडाळ १६० रुपये किलो, तर चांगल्या दर्जाची तूरडाळी १९०- १९३ रुपयांपर्यंत मिळत आहे. दिवाळीच्या मुख्य सणाच्या कालावधीपर्यंत हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गूळ, साखरेचा वापर अधिक
दिवाळीतील भाऊबीज, पाडवा, लक्ष्मीपूजन अशी विविध उत्सवी समारंभावेळी गोड, तिखट अशा पदार्थावर भर असतो. या दिवसांत प्रत्येक घरामध्ये मिठाई तसेच चिवडा, पोहे आधी तयार केले जातात.
गावठी पोह्याचीही दरवाढ शक्य
दिवाळीला अन्य राज्यांतून दाखल होत असलेल्या पोह्यांच्या तुलनेत गोव्यातील गावठी पोहे हे जास्त खपतात. गेल्या वर्षी गावठी पोह्यांचे दर ७० रुपये किलो होते. त्यात यंदा आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे.
महागाईचा झटका
गोमंतकीयांसाठी गणेश चतुर्थीप्रमाणेच दिवाळी सणही तेवढाच आनंदोत्सव असतो. सर्व जण एकत्र येऊन उत्साहाने हा सण साजरा करतात. मात्र, सध्या वाढत्या महागाईमुळे मध्यमवर्गीय व सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना हात राखूनच खर्च करावा लागत आहे. सणासुदीचे दिवस असल्यामुळे खरेदी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो त्यातही महागाईचा सामना करावा लागतो.
सण, उत्सव म्हटले की, खाद्यपदार्थासाठी वस्तूंची खरेदी करावीच लागते. त्यात घरात लहान मुले असली की चकल्या, करंज्या, तसेच अन्य मिठाईही बनवावी लागते. सणासुदीसाठीच्या आवश्यक वस्तूंचे दर वाढले तरी ते खरेदी करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. सध्या बाजारात सर्व खाद्यपदार्थासाठीच्या वस्तू, तेल, तूप आदींचे दर वाढले आहेत. त्यामुळे स्वत:वर नियंत्रण ठेवून खरेदी करावी लागत आहे. - वासंती नाईक, फोंडा
आपल्यासाठी गणेश चतुर्थी व दिवाळी सणही तेवढाच महत्त्वाचा असल्यामुळे सणांबाबत कोणतीही तडजोड करणे शक्य होत नाही. सणांवेळी अनेक जवळच्या नातेवाइकांना फराळ, गोड पदार्थ द्यावे लागतात. त्यामुळे महाग असली तरी खरेदी करावीच लागते. - संपदा पाटील, गृहिणी