लोकमत न्यूज नेटवर्क पणजी / मडगाव : 'आजवर इयत्ता चौथीच्या गोमंत बाल भारती पाठ्यपुस्तकात गोव्याचा स्वातंत्र्यलढा शिकविण्यात येत होता. आता पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता अकरावीच्या इतिहासाच्या पुस्तकात क्रांतिलढा आणि गोव्याचा स्वातंत्र्यलढा शिकवण्यात येणार आहे,' असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. पणजीतील आझाद मैदानावर रविवारी क्रांतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, मंत्री रोहन खंवटे, सुदिन ढवळीकर, आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष गुरुदास कुंदे, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, मडगाव येथील लोहिया मैदानावर क्रांतिदिन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोहिया यांचे सुपुत्र डॉ. रमेशचंद्र लोहिया यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिक गुरुदास कुंदे, रोहिदास देसाई, विष्णू आंगले व वामन प्रभुगावकर यांचाही सत्कार करण्यात आला.
पणजीत आझाद मैदानावरील कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले, 'गेल्यावेळी राज्यातील स्वातंत्र्य चळवळीदरम्यान झालेल्या अनेक बंडांचा आम्ही पाठ्यपुस्तकात समावेश करण्याचे आश्वासन दिले होते. ते आम्ही पूर्ण केले आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले सर्वोच्च बलिदान, त्यांचा त्याग युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ११ वीच्या पुस्तकात त्यांच्या समावेशाचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काळ तंत्रज्ञानाचा आहे, अशावेळी कोडिंग आणि रोबोटिक, स्टार्टअप संकल्पना, कौशल्यपूर्ण भारत यांसारख्या गोष्टीत क्रांती करण्याची गरज आहे', असे मुख्यमंत्री म्हणाले.
पत्रादेवी स्मारक लवकरच पूर्ण
'देशात सध्यात अमृतकाळ सुरु आहे. या अमृतकाळात पत्रादेवी स्मारकाचे काम लवकरच पूर्ण करू. डॉ. राममनोहर लोहिया मैदान, बंड करण्यात आलेली स्मारके, रेईश माणूस किल्ला या ऐतिहासिक ठिकाणांची योग्य प्रकारे देखरेख करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पुढच्या क्रांतिदिनापूर्वी नोकऱ्या देऊ
स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आम्ही जाहीर केले होते. गेल्या १० वर्षांत त्यांना आम्ही नोकऱ्या दिल्या; पण एकाने जवळपास तीन वेळा नोकऱ्या बदलल्या. यातून योग्य प्रकारे यादी तयार करण्यासाठी अडथळा येत आहे; परंतु पुढच्या क्रांतिदिनापूर्वी उर्वरित सर्वांना नोकऱ्या देऊ,' असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.
स्वातंत्र्यसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही
'राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांवर सरकार अजिबात अन्याय होऊ देणार नाही. जे दोन ते तीन स्वातंत्र्यसैनिक पेन्शनविना राहिले आहेत, त्यांच्या घरी जाऊन आमचे अधिकारी पेन्शन प्रक्रिया पूर्ण करतील. पुढील दीड ते दोन महिन्यांमध्ये त्यांची पेन्शन सुरु होईल,' असे मुख्यमंत्र्यानी सांगितले.
नव्या योजना लोकांच्या हितासाठी
गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही 'माझी बस योजना' सुरू केली. योजनेमुळे गावांना शहरांशी जोडण्यास मदत होणार आहे. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामीण मित्र योजना सुरू करण्यात येणार आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर ठरेल. राज्यात सौर ऊर्जा, अक्षय ऊर्जेसंदर्भात नवे धोरण राबविले जाईल. पंतप्रधानांनीही राज्याचे कौतुक केले आहे. असे धोरण राबविणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरेल, असेही सावंत यांनी सांगितले.