वास्को: ऑगस्ट महीन्यापेक्षा सप्टेंबर महिन्यात मुरगाव तालुक्यातील विविध भागात डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळण्याची संख्या कमी झाली असलीतरी, ह्या महीन्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळून आले आहेत. मुरगाव तालुक्यातील चिखली उपजिल्हा रुग्णालयात सप्टेंबर महिन्यात लोकांची डेंग्यूबाबत केलेल्या ‘एनएस१’ तपासणीत ३५० लोकांना डेंग्यू सदृश्य ताप आल्याचे उघड झाले आहे.
गोव्याच्या इतर भागाबरोबरच मुरगाव तालुक्यातील विविध भागात डेंग्यू झालेले रुग्ण काही दिवसापासून वाढत असल्याने लोकात तो चिंतेचा विषय बनला आहे. मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी, वास्को, दाबोळी आणि मुरगाव अशा चारही मतदारसंघातील विविध भागातून डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण बऱ्याच प्रमाणात आढळत असल्याची माहीती चिखली उपजिल्हा इस्पितळातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. ऑगस्टात चारही मतदारसंघातील विविध भागातून आलेल्या नागरिकांपैकी सुमारे ३९० जणांना डेंग्यू सदृश्य ताप आल्याचे चिखली उपजिल्हा रुग्णालयात केलेल्या ‘एनएस१’ चाचणीतून उघड झाले होते अशी माहीती इस्पितळातील सूत्रांकडून मिळाली. सप्टेंबर महिन्यात मुरगाव तालुक्यातील विविध भागात आढळणाऱ्या डेंग्यू सदृश्य तापाच्या रुग्णांची संख्या थोडी कमी झाली आहे. सप्टेंबर महिन्यात चिखली उपजिल्हा रुग्णालयात चाचणीसाठी आलेल्यांपैंकी सुमारे ३५० जणांना डेंग्यू सदृश्य ताप आल्याचे चाचणीतून उघड झाल्याची माहीती मिळाली.
मुरगाव तालुक्यातील वाडे, नवेवाडे, झुआरीनगर, खारीवाडा, बायणा इत्यादी भागातून सप्टेंबर महिन्यात इतर भागापेक्षा जास्त डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळल्याची माहीती चिखली उपजिल्हा इस्पितळ आणि वास्को शहरी आरोग्य केंद्रातील सूत्रांकडून मिळाली. तसेच सडा, मांगोरहील, आदर्शनगर इत्यादी भागातून कीरकोळ प्रमाणात डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळल्याची माहीती मिळाली. सप्टेंबर महिन्यात चिखली उपजिल्हा रुग्णालयात सुमारे ३५० डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळून आलेले असून त्या व्यतिरिक्त मुरगाव तालुक्यातील खासगी रुग्णालयातसुद्धा डेंग्यू सदृश्य तापाचे अनेक रुग्ण आढळून आल्याची माहीती मिळाली.
डेंग्यू सदृश्य तापाचे सप्टेंबर महिन्यात आढळून आलेल्या रुग्णापैंकी बहुतेकांवर उपचार होऊन ते बरे झाले आहेत तर काहींवर उपचार चालू आहेत. मुरगाव तालुक्यातील विविध भागात डेंग्यूचे प्रमाण वाढूनये यासाठी वास्को शहरी आरोग्य केंद्र, मुरगाव नगरपालिका आणि इतर संबंधित आस्थापने विविध पावले उचलीत असल्याची माहीती मिळाली. त्यासाठी मुरगाव तालुक्यातील विविध भागात औषधांची फव्वारणी करणे, मोहीम राबवून ज्याठीकाणी पाणी साचलेले आहे (बॅरलात आणि इतर वस्तूत) ते खाली करणे अशा प्रकारची विविध पावले उचलण्यात येत असल्याची माहीती मिळाली.