लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सत्तरी तालुक्यात भाजप सदस्य संख्येबाबत रेकॉर्डच झाला हे काल स्पष्ट झाले. चाळीस हजारच्या आसपास सदस्य संख्या आली आहे. मात्र दुसऱ्याबाजूने पेडणे, कुंभारजुवे, शिवोली, हळदोणे या मतदारसंघात भाजपचे सदस्य होण्यासाठी जास्त लोक पुढे आलेले नाहीत.
वाळपई मतदारसंघात २० हजार २१५ एवढी सदस्य संख्या झाली आहे. पर्ये मतदारसंघात १८ हजार ३७४ सदस्य झाले. दोन्हीकडे मिळून ३८ हजारहून अधिक सदस्य झाले. येत्या चार दिवसांत चाळीस हजार सदस्य संख्या होणार आहे. मंत्री विश्वजीत राणे व आमदार डॉ दिव्या राणे यांनी जोर धरल्यानंतर सत्तरी तालुक्यात भाजपची सदस्य संख्या वाढली. या उलट मुरगाव तालुक्यातील दोन्ही मतदारसंघांमध्ये मिळून एकूण तेवीस हजार सदस्य संख्या झाली. डिचोली तालुक्यात ३२ हजार नोंदणी झाली.
शिवोली, कळंगुट, पेडणे येथे भाजपचेच आमदार आहेत पण तिथे सदस्य नोंदणीची गाडी पुढे जात नाही. लोक सदस्य होत नाहीत. शिवोलीत फक्त २ हजार २७० तर पेडण्यात फक्त ३ हजार १३६ सदस्य झाले आहेत. कळंगुटमध्ये दोन हजार देखील सदस्य झाले नाही. पणजीत आता मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी जोर धरल्यानंतर ७ हजार ८७१ सदस्य झाले.
धक्कादायक म्हणजे कुंभारजुवे मतदारसंघात फक्त ३ हजार ३१५ सदस्य भाजपला मिळाले आहेत. प्रियोळमध्ये ५ हजार ५०० झाले पण फोंड्यात ५ हजार २५१ सदस्य झाले. मडकई मतदारसंघात एकदम कमी म्हणजे ८०४ एवढेच लोक भाजपचे सदस्य झाले आहेत. हळदोणे मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे, तिथे भाजपला २ हजार ९३७ एवढेच सदस्य मिळाले.