समीर नाईक, गोवा-पणजी: सांतीनेझ येथील वेलनेस फार्मसी जवळील दोनशे वर्षे जुने वडाचे झाड अखेर इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडच्या व्यवस्थानतर्फे शुक्रवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास कापण्यात आले. यातून निसर्गप्रेमी आणि स्थानिकांमध्ये असंतोषाचे वातावरण असून निसर्गप्रेमींनी प्रशासनविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविली आहे.
स्मार्ट सिटीच्या कामात अडथळा ठरत असल्याने प्रशासनाने हे दोनशे वर्ष जुने वडाचे झाड कापण्याचे ठरविले होते. शुक्रवारी सकाळपासून सांतीनेझ येथे वडाचे झाड कापण्यात येत असल्याने तणावाचे वातावरण होते. दुपारी काही प्रमाणात या झाडाच्या फांद्या कापण्यात आला. हे पाहून गोवा ग्रीन ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि काही समाज कार्यकर्ते या ठिकाणी पोहचले होते. दरम्यान कार्यकर्त्यांनी वन खात्याकडे याबाबत तक्रारही दिली होती, परंतु असे असूनही कारवाई होत नसल्याने हा तणाव अधिक वाढला होता. अखेर या ठिकाणी पोलिस सुरक्षा वाढविण्यात आली होती. रात्री ११ पर्यंत येथे कार्यकर्ते, वन खात्याचे अधिकारी, आणि पोलिस उपस्थित होते. कार्यकर्ते घरी परतताच हे झाड कापण्यात आले.
कार्यकर्त्यांनी घातले होते कडक गाऱ्हाणे
घरी जाण्यापूर्वी प्रशासनाने झाड कापू नये यासाठी उपस्थित कार्यकर्ते आणि समाज कार्यकर्त्यांनी येथे नारळ फोडून प्रशासनाला धडा शिकवण्याचे कडक गाऱ्हाणे देखील घातले होते. पण तरी या गोष्टींना न जुमानता प्रशासनाने हे जूने झाड अखेर कापले.