नारायण गावस
पणजी : राज्यात आज पावसाने जाेरदार हजेरी लावली. पण या पहिल्याच पावसाने पणजी स्मार्ट सिटी तुंबल्याने पणजीतील नागरिकांसह पणजीत येणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागला. पणजीतील सर्व प्रमुख रस्त्यावर पाणी भरले तसेच खोदलेल्या खड्ड्यामध्ये पाणी भरल्याने अनेक गाड्या रुतल्या. पणजी महानगर पालिकेचे महापौर राेहित मोन्सेरात यांनी या पुरस्थितीची पाहणी करुन स्थितीचा आढावा घेतला.
पणजीत सकाळी १० वाजल्यापासून पावसाला सुरवात झाली. अचानक जाेरदार आलेल्या पावसाने वाहनधारकांची तसेच कामगारांची तारांबळ उडाली. पणजीत स्मार्ट सिटीच्या कामानिमित्त ठिकठिकाणी रस्ते खोदले होते. या खोदलेल्या खड्ड्यात आणि साचलेल्या पाण्यात अनेक गाड्या रुतल्या. तसेच विविध रस्त्यावर पाणी साचलेले होते. पणजीतील १८ जून रस्ता दयानंद बांदाेडकर मार्ग, मांडवी पुल, दिवजा सर्कल, सांतीनेज परिसर पणजी बसस्थानक तसेच पणजी मार्केट परिसरात पाणी साचले होते. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली.
घरांमध्ये दुकानांमध्ये घुसले पाणी
आचानक जाेरदार आलेल्या पावसाने व वादळी वाऱ्यामुळे पणजीतील दुकानांमध्ये तसेच लोकांच्या घरात पाणी शिरले. पार्क करुन ठेवल्या कार तसेच दुचाकीवर झाडे पडली तसेच वीज खांबही पडले. तसेच अनेक पार्क केलेल्या गड्या पाण्याखाली गेल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी पडलेली झाडे साफ करुन रस्ते सुरळीत केले. दुचाकींप्रमाणे चारचाकीही या स्मार्ट सिटीच्या खोदलेल्या खड्ड्यात रुतल्या होत्या. भरपावसात लाेकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
पणजीतील नागरिकांचा संताप
पणजी प्रत्येक वर्षी पहिल्याच पावसाने तुंबत असते पण महानगर पालिका याच्यावर अजून योग्य नियंत्रण आणले नसल्याने पणजीवासीय आक्रमक झाले. महानगर पालिका प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी कामे करणारअसे आश्वासन दिले जाते. पण पहिल्याच पावसाने पणजी बुडत असल्याने पणजीतील लाेक कंटाळले आहेत. गेली अनेक वर्षे पणजीत स्मार्ट सिटीची कामे सुरु आहे. या स्मार्ट सिटीने खोदलेल्या खड्ड्यातील चिखलाचे पाणी शहरातील दुकानामध्ये तसेच लोकांच्या घरात गेले. स्मार्ट सिटीच्या कामाचा लोकांनी राग व्यक्त केला. निदान पावसाळ्यापूर्वी तरी सर्व कामे करा अशा प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
महापौरांची भर पावसात पाहणी
पणजी महानगर पालिकेचे महापौर राेहित मोन्सेरात यांनी भर पावसात रेनकॉट घालून बुडालेल्या पणजीची पाहणी केली. महापौर म्हणाले पणजी महानगर पालिकेने पणजीतील सर्व गटारे साफ केले आहे. पहिल्या पावसात पाणी साचत असते. गेल्या वर्षी पूर न आलेल्या भागात यंदा पाणी साचले. या पूरस्थित भागाची पाहणी केली आहे. सोमवारी या विषयी विषेश बैठक बोलाविली असून यावर योग्य तोडगा काढला जाणार आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या कामांची याेग्य दखल घेतली जाणार आहे.