लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : पर्वरी येथील विधानसभा संकुलातील मंत्री ब्लॉकच्या नूतनीकरणाचे मंत्रालय या नामकरणाने उद्घाटन करण्यात आले. नामकरणाने आयोजित करण्यात आलेला उद्घाटन सोहळा हा शानदार झाला. मात्र, विरोधी पक्षाचा एकही आमदार किंवा पदाधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता.
मंत्रालयाच्या प्रवेशद्वारापासून सनई-चौघड्यांचे वादनाने मंगल वातावरणाची निर्मिती, गणपतीची विशालकाय मूर्ती आणि तिसऱ्या मजल्यावरील प्रशस्त, सुसज्ज असे मुख्यमंत्र्यांचे कार्यालय या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आलेल्या या उद्घाटन सोहळ्यात वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, मच्छीमार मंत्री नीळकंठ हळणकर, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, वीज मंत्री सुदिन ढवळीकर, मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री सुभाष फळदेसाई व इतर मान्यवर उपस्थित होते.
असे आहे मुख्यमंत्र्यांचे कार्यालय
इमारतीच्या तिसया मजल्यावर केवळ मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आहे. कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी भगवान विष्णूचे विश्वरूप दर्शन असलेला कोरीव स्तंभ उभारण्यात आला आहे. ही सुंदर कलाकृती खास उडुपी येथून करून घेण्यात आली आहे. येथून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात प्रवेश केल्यावर समोर मुख्यमंत्र्यांचे आसन आणि त्यामागे देशाचे बोधचिन्ह त्रिमूर्ती सिंह आणि त्याखाली सत्यमेव जयते' हे ब्रीदवाक्य आहे. मुख्यमंत्र्यांच्या आसनाच्या उजवीकडे श्रीकृष्णाची बासुरीधारी मूर्ती आहे.
सर्वांना निमंत्रण दिले होते: मुख्यमंत्री
विरोधी पक्षांपैकी एकाही आमदाराने किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्याने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली नाही. विरोधकांच्या अनुपस्थितीविषयी विचारले असता मुख्यमंत्री डॉ. सावत म्हणाले की, मंत्रालय हा एखाद्या पक्षाचा विषय नसून तो सर्वांचा आहे. सर्व ४० आमदारांना कार्यक्रमाचे निमंत्रण होते. शिवाय सर्व पक्षांच्या अध्यक्षांनाही निमंत्रण होते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
बहिष्कार नाही, पण....
उद्घाटन सोहळ्यास काँग्रेससह विरोधी पक्षांची अनुपस्थिती म्हणजे बहिष्कार समजायचा का ? असे विचारले असता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले की, 'बहिष्कार नाही, परंतु नाराजी मात्र स्पष्ट आहे. कल्याणकारी योजनांवर खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत आणि इथे मंत्रालयावर दहा कोटी रुपये खर्च केले जातात हे आमच्या आमदारांना रुचले नसेल.
- विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना या कार्यक्रमात अनुपस्थित राहण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की ते गोव्या बाहेर असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत.
- रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले की, त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण होते, परंतु काही महत्त्वांच्या कामात व्यस्त होते आणि त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.