पणजी : कर बुडवेगिरी केल्या प्रकरणी आयकर खात्याच्या अधिकाय्रांनी राज्यातील फार्मास्युटिकल तसेच इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांवर धाडी घालून गेल्या तीन-चार दिवसात करोडो रुपये जप्त केल्याची माहिती मिळाली आहे.
वेर्णा व करासवाडा औद्योगिक वसाहतींमधील तीन फार्मा कंपन्यांची झडती घेण्यात आले. यातील एक फार्मास्युटिकल कारखान्यात कोविड चांचणीसाठी किट बनवण्यात येते. देशी व आंतराष्ट्रीय बाजारपेठेत या कोविड चाचणी किटचा पुरवठा केला जातो. म्हापसा येथील अन्य एक फार्मा उद्योग औषधे बनवून देश, विदेशात विकतो.
आयकर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपसात असे आढळून आले आहे की, खरे उत्पन्न लपवण्यासाठी काही कंपन्यांनी बोगस बिले वापरली.
दरम्यान, आठ वेगवेगळ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांची व दोन हॉटेल उद्योग समुहांचीही झडती घेण्यात आली. या कंपन्या बडे विवाह समारंभ आयोजित करत होते. या कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात कर बुडवल्याचे आढळून आले आहे. दिवाडी, दोनापॅाल, करंझाळे, पर्वरी, पाटो व मळा येथील इव्हेंट कंपन्यांच्या कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या.
दरम्यान, गोवा राज्य फार्मा हब म्हणून ओळखले जाते. देशभरात उत्पादन होणाय्रा औषधांपैकी १२ टक्के औषधे गोव्यात उत्पादित होतात व ७० टक्के निर्यात केली जातात, अशी अधिकृत आकडेवारी सांगते. गोव्यात अनेक फार्मा कंपन्या कार्यरत आहेत. राज्यात सध्या कार्यरत असलेल्या अंदाजे ८० फार्मास्युटिकल युनिट्समधून दरवर्षी सुमारे १४ हजार कोटींची उलाढाल केली जाते. दरवर्षी सुमारे ११ हजार कोटींच्या औषधांची निर्यात केली जाते आणि अन्य उत्पादने भारतात विकली जातात अशीही अधिकृत माहिती आहे.