लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील प्रकल्पांचे काम देण्यासाठी यापुढे जीसुडा अभियांत्रिकी कंपन्यांची नियुक्ती करण्यासाठी निकष ठरवेल. ज्या कंपन्यांनी जीसुडाच्या प्रकल्पांचे काम अर्धवट सोडले किंवा त्यांना काम पूर्ण करता आले नाही, त्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकले जाईल, असा इशारा नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी दिला.
जीसुडाने वरिष्ठ सीए ललित शहा यांची नियुक्ती केली आहे. शहा यांनी यापूर्वी सरकारच्या विविध महामंडळांवर काम केले आहे. अनेक प्रकल्पांची कामे त्यांनी हाताळली आहेत. त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता शहा हे जी सुडाअंतर्गत मागील तीन वर्षांत हाती घेतलेल्या सर्व प्रकल्पांचे तसेच प्रकल्पांवर खर्च केलेल्या निधीचा ऑडिट करतील व त्याचा अहवाल तयार करतील, असेही राणे यांनी सांगितले.
जीसुडाचे प्रकल्प वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे ही कामे करण्यासाठी ज्या कंपनींची निवड केली जाईल, त्यांच्यासाठी आता निकष ठरवणे महत्त्वाचे आहे. प्रकल्पांचे काम अपूर्ण ठेवलेल्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकले जाईलच; पण ज्या अधिकाऱ्यांवर या कामाची जबाबदारी सोपवली होती, त्यांच्याकडूनही स्पष्टीकरण मागितले जाईल, असेही मंत्री राणे म्हणाले.
१८९ कोटी मंजूर
केंद्र सरकारने गोव्यासाठी १८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी राज्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पांचा दर्जा सुधारण्यासाठी शहर विकास खात्यांतर्गत ८९ कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे. तसेच या निधीच्या माध्यमातून पाणीपुरवठा, शाश्वत विकास, जलसंवर्धन आणि शहरी पायाभूत सुविधा सुधारण्यास मदत होईल, असेही मंत्री राणे यांनी नमूद केले.
- जीसुडा तसेच शहरी विकास खात्याचे प्रकल्प अपूर्ण राहिले आहेत किंवा वेळेनंतर पूर्ण झाले आहेत, त्याचा खर्च संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांक डून वसूल केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
- सरकार राज्यात मोठ्या प्रमाणात नवनवीन प्रकल्प राबवत आहे. त्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे प्रकल्पाशी संबंधित असणाऱ्यांनी योग्य पध्दतीने कामे मार्गी लावावीत.
- यापुढे कोणत्याही कंपनीला काम देताना त्या कंपनीची पार्श्वभूमी तपासली जाईल. त्यानंतर त्या कंपनीला काम देण्याचा विचार केला जाईल.
- जीसुडाने वरिष्ठ सीए ललित शहा यांची नियुक्ती केली आहे. शहा आता तीन वर्षांत हाती घेतलेल्या सर्व प्रकल्पांचे तसेच प्रकल्पांवर खर्च केलेल्या निधीचा ऑडिट करतील व त्याचा अहवाल तयार करतील, असेही राणे यांनी सांगितले